मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जबलपूर येथून आपल्या प्रचारास सुरूवात केली. यावेळी प्रियंका गांधी यांनी मध्य प्रदेशातील नागरिकांना ५ मोठी आश्वासने दिली आहेत. २२५ महिन्यांत राज्यातील भाजपा सरकारने २२० घोटाळे केले आहेत, असा आरोपही प्रियंका गांधींनी केला आहे.

प्रियंका गांधींनी ग्वारीघाट येथे नर्मदा नदीची आरती केली. यानंतर शहीद स्मारक येथील सभेला संबोधित केलं. तेव्हा शेतकरी, महिला, वीज बिल, जुनी पेन्शन योजना याबद्दल आश्वासने प्रियंका गांधींनी दिली आहेत.

“प्रत्येक महिन्याला महिलांना १५०० हजार रुपये, गॅस सिलेंडर ५०० रुपयांत दिला जाणार. १०० युनिट पर्यंत विज मोफत मिळणार. २०० युनिटपर्यंत विजेच्या वापरावर अर्धे बिल आकारले जाईल. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. सरकार आल्यावर १०० टक्के आश्वासनाची पूर्तता केली जाईल. ही आश्वासने कर्नाटकातही दिली गेली होती. सरकार आल्यानंतर सर्व आश्वासने पूर्ण केली,” असं प्रियंका गांधींनी सांगितलं.

हेही वाचा : “…तर पंतप्रधान मोदी हे ‘नरेंद्र पुतिन’ बनतील”, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल!

शिवराज सिंह चौहान सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत प्रियंका गांधी म्हणाल्या, “गेल्या तीन वर्षात केवळ २१ जणांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. जेव्हा ही आकडेवारी मला मिळाली, तर याची सत्यता तपासण्यासाठी माझ्या कार्यालयास सांगितलं. तेव्हा ही वस्तुस्थिती खरी असल्याचं समोर आलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : लोकसभेच्या उमेदवारीवर ब्रिजभूषण सिंह ठाम; न्यायालयाच्या निकालानंतरच कुस्तीगीर आंदोलनावर भाष्य 

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे प्रियंका गांधींनी टीका केली. “मध्य प्रदेशातील काही नेत्यांनी सत्तेसाठी पक्षाची विचारधारा सोडली,” असं प्रियंका गांधींनी म्हटलं.