उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही या वादामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट करत यांचेही गुडघे दिसत आहेत असा टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अरे देवा, त्यांचे गुडघे दिसत आहेत,” अशा कॅप्शनसहीत प्रियंका यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. रावत यांनी गुडघे दिसणाऱ्या महिलांसंदर्भात वक्तव्य केल्याने त्याचा आधार घेत प्रियंका यांनी या वरिष्ठ नेत्यांचेही गुडघे दिसत होते असा टोला लगावला आहे.

रावत काय म्हणाले होते?

एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला पालक जबाबदार असतात, असंही ते म्हणाले.

रावत यांनी सांगितला तो अनुभव

मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला होता. “एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते,” असं रावत म्हणाले. पुढे बोलताना रावत म्हणाले,”माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि गुडघे दिसणारी फाटलेली जीन्स घालून फिरते,अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले होते.

महिला नेत्यांनाही साधला निशाणा

अनेक महिला नेत्यांनाही या वक्तव्यावर टीका केली असून यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांसहीत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे.महुआ यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री रावत यांनीच केलेलं वक्तव्य पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधालाय. “उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले, खाली पाहिलं तेव्हा गमबुट होते. वर पाहिलं तर… एनजीओ चालवता आणि कपडे गुडघे फाटलेले घालता. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा वर, खाली, पुढे, मागे सगळीकडे आम्हाला केवळ एक निर्लज्ज माणूस दिसला. एका राज्याची धुरा तुमच्या हाती आहे मात्र मेंदू फाटका आहे तुमचा,” अशा शब्दांमध्ये महुआ यांनी मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर स्वत:चा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या रिप्ट म्हणजेच फाटक्या वाटणाऱ्या जीन्ससंदर्भात वक्तव्य केलं तशीच जीन्स घातलेला स्वत:चा फोटो प्रियंका यांनी पोस्ट केलाय. “रिप्ट जिन्स आणि पुस्तक. देशातील संस्कृती आणि संस्कारांना अशा पुरुषांपासून धोका आहे जे महिलांना आणि त्यांनी निवडलेल्या गोष्टींवरुन त्यांच्याबद्दलचं मत तयार करतात. मुख्यमंत्री रावतजी तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे देश बदलेल,” असा टोला प्रियंका यांनी लगावला आहे.

तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यानंतर #RippedJeans आणि #RippedJeansTwitter हे दोन हॅशटॅग चर्चेत आहेत. अनेक महिला त्यांनी परिधान केलेल्या रिप्ट जिन्समधील फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi vadra shares a photo of rss leaders to slam tirath singh rawats ripped jeans comment scsg
First published on: 19-03-2021 at 08:05 IST