नवी दिल्ली : ‘उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोग’ (यूकेएसएसएससी) परीक्षेच्या कथित पेपरफुटीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भाजपवर टीका केली. या पक्षाला ‘पेपर चोर’ म्हटले जात असल्याचे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले आणि पेपरफुटीविरोधात उत्तराखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, बेरोजगारी ही आज देशासमोरील सर्वात मोठी समस्या असून ती थेट मतचोरीशी जोडलेली असल्याचेदेखील राहुल गांधी म्हणाले. “पेपर चोरांना माहीत आहे की तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तरी ते निवडणुकीत मते चोरून सत्तेत राहतील,” अशी टीका राहुल यांनी केली. तरुण रस्त्यावर उतरले आहेत आणि ‘पेपर चोर, गद्दी छोड’ अशा घोषणा देत आहेत. ही फक्त तरुणांच्या नोकऱ्यांसाठीची लढाई नाही; ही न्याय आणि लोकशाहीसाठीची लढाई आहे. न्यायाच्या या लढाईत प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणांसोबत खंबीरपणे उभा असल्याचेदेखील राहुल गांधी म्हणाले.

वेस्ट बँकइस्रायलला घेऊ देणार नाही

 ‘व्याप्त ‘वेस्ट बँक’ इस्रायलला घेऊ देणार नाही,’ असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केले.ब्रिटन, कॅनडासह इतर अनेक देशांनी पॅलेस्टाइनला मंजुरी दिल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून ‘वेस्ट बँक’ क्षेत्रावर ताबा मिळविण्याची चर्चा इस्रायलमध्ये होती. मात्र, ट्रम्प यांनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘इस्रायलला ‘वेस्ट बँक’वर ताबा घेऊ देणार नाही. मी तशी परवानगी देणार नाही. असे कदापि होणार नाही. मी नेतान्याहू यांच्याशी बोललो होतो. या क्षेत्रावर इस्रायलला ताबा घेऊ देणार नाही, यावर मी ठाम आहे. जितके झाले ते पुरे झाले. आता थांबायची वेळ आहे.’ ‘वेस्ट बँक’ येथे पॅलेस्टाइनचे प्रशासन आहे. गाझासारखी परिस्थिती ‘वेस्ट बँक’ येथे नाही. वेस्ट बँकेवर इस्रायलने अधिकृत ताबा मिळविला, तर द्विराष्ट्र उपायाचा मुद्दाच नाहीसा होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ पत्रकार एम. एल. कोत्रू कालवश

नवी दिल्ली : ‘द स्टेट्समन’ या इंग्रजी वृत्तपत्राचे माजी निवासी संपादक आणि पत्रकारांच्या एका पिढीचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार एम.एल. कोत्रू यांचे गुरुवारी रात्री गुरुग्राम येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कोत्रू यांनी लंडनच्या ‘द संडे टाइम्स’चे भारतातील प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले. ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ आणि ‘प्रेस असोसिएशन’मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते १९९४मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द काश्मीर स्टोरी’चे लेखक आणि ‘एशिया ७२: द ऑफिशियल गाइड’चे संपादक होते. “सहा दशकांच्या माध्यमातील कारकीर्दीत कोत्रू यांनी पत्रकारांच्या पिढ्यांना मार्गदर्शन केले,’’ अशा शब्दांत ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

तेलंगणात मुसळधार, जनजीवन विस्कळीत

हैदराबाद : तेलंगणमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. राजधानी हैदराबादसह राज्यातील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे कार्यालयीन लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पावसानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले. दरम्यान, हवामान खात्यानेही राज्यात मुसळधार पावसाचा अंंदाज व्यक्त केला आहे. नारायणपेट जिल्ह्यातील नारवा येथे सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत सर्वाधिक ४४.३ मिमी, विकाराबाद जिल्ह्यातील मुजाहिदपूर येथे ४४ मिमी, हैदराबादमध्ये दाबीरपुरा येथे २८.५ मिमी आणि कुथबुल्लापूरमधील आदर्शनगर येथे १८ मिमी पावसाची नोंद झाली.

एफबीआयच्या माजी संचालकांवर खोटे बोलल्याचा आरोप

वॉशिंग्टन : ‘एफबीआय’चे माजी संचालक जेम्स कॉमे यांच्यावर लोकप्रतिनिधीगृहाशी खोटे बोलल्याचा अधिकृतरीत्या आरोप ठेवण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वकिलांना ‘एफबीआय’चे माजी संचालक आणि इतरांविरुद्ध फौजदारी खटला दाखल केल्यानंतर काही दिवसांनंतर हे आरोप अधिकृतपणे ठेवण्यात आले आहेत. अशा पद्धतीने खटला दाखल होणारे कॉमे हे पहिले वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आहेत. २०१६ मधील अमेरिकी निवडणुकीत रशियाच्या कथित हस्तक्षेपाप्रकरणी झालेल्या चौकशीचे हे प्रकरण आहे. ही चौकशी एक लबाडी होती, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारामध्ये रशियाचा हात असल्याचे सरकारच्या अनेक सर्वेक्षणातून उघड झाले होते. कॉमे यांच्यावर अधिकृतपणे खटला दाखल केल्यानंतर त्यांचे जावई ट्रॉय एडवर्ड यांनी सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला आहे.