बीजिंग :चीन सरकारचे वादग्रस्त ‘शून्य कोविड धोरण’ आणि सरकार लागू करत असलेली टाळेबंदी यांविरोधात देशभरात उसळलेला जनउद्रेक कायम असून हे आंदोलन थोपावण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. चीन सरकारनेही ‘शून्य कोविड धोरणा’वरील चिंता फेटाळून लावल्या आहेत. बीजिंगमध्ये करोनाबाधितांची ४० हजार प्रकरणे नोंदली गेली असून प्रशासन करोनाचे संक्रमण आणि क्षी जिनपिंग राजवटीविरोधातील जनआंदोलन रोखण्याच्या कामात गुंतले आहे.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सर्वोच्चपदी निवडून आल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर होणारी ही निदर्शने गेल्या काही दिवसांत शांघाय, बीजिंग आणि देशाच्या अनेक भागांत पसरली आहेत. दरम्यान, शांघायमधील निदर्शनांचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या बीबीसी पत्रकाराला अटक करण्यात आली असून चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या अटकेचे समर्थन केले. वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराने त्याचे माध्यम ओळखपत्र सादर करण्यास नकार दिल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे लिजियान म्हणाले. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, सोमवारी ३९,४५२ करोनाबाधितांची नोंद झाली,  ज्यात ३६,३०४ जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र सलग पाचव्या दिवशी बीजिंगमध्ये जवळपाच चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे.