नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कथितरीत्या झालेली मतांची चोरी, बिहारमधील मतदार फेरआढावा मोहीम या दोन मुद्द्यांवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने संसदभवनातून मोर्चा काढला. सुमारे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. बहुतांश मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. विशेष म्हणजे ‘इंडिया’तून बाहेर पडलेले ‘आप’चे खासदारही मोर्चात सहभागी झाले.
आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विरोधकांची एकजूट पाहायला मिळाली. विरोधी खासदारांनी संसदेच्या मकरद्वारापासून मोर्चा काढला. संसदभवनाबाहेर काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा अडवला. मोर्चासाठी रीतसर परवानगी नव्हती, तसेच, संसदेच्या आवारात जमावबंदी लागू असल्याचे सांगत पोलिसांनी विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोर्चा संसदेपासून काही अंतरावर असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकला नाही.
विरोधी पक्षांतील खासदार सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन निवदेन देणार असल्याचे पत्र काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले होते. मात्र आयोगाने सोमवारी दुपारी १२ वाजता ३० प्रतिनिधींसह भेटण्यास यावे, असे पत्र रमेश यांना दिले. मात्र मोर्चातील सर्व खासदार आयोगाला भेटतील, अन्यथा कोणीही आयोगाची भेट घेणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोर्चानंतर विरोधी पक्षांनी आयोगाला भेट दिली नाही. सर्व विरोधी खासदार एकत्रितपणे आयोगाला भेटूनच निवेदन देऊ, असे रमेश यांचे म्हणणे होते.
लोकशाहीची अवस्था काय झाली आहे बघा. ३०० खासदार निवडणूक आयोगाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. आम्ही सगळे येऊन तुम्हाला निवेदन देतो, असे सांगतात. पण, आयोग त्यांना भेटण्यास तयार नाही. ३०० खासदार भेटले तर सत्य बाहेर येईल ही भीती आयोगाला वाटते.– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना देशात अराजक निर्माण करायचे आहे. भारतातील लोकशाही नष्ट करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ‘मोठ्या शक्तीं’ची भाषा राहुल गांधी बोलत आहेत. तीन लोकसभा निवडणुका आणि यादरम्यान विधानसभांमधील पराभवामुळे काँग्रेस ‘राजकीय दिवाळखोरी’च्या स्थितीत गेली आहे. – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री