सुलेमानिया : इराणमध्ये शनिवारी अनेक ठिकाणी सरकारविरोधी निदर्शने झाली. यात दोन जण मृत्युमुखी पडले. या सरकारविरोधी निदर्शनांचा हा चौथा आठवडा आहे. हिजाब न घातल्याने अटक केलेल्या २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये हिजाबविरोधी तीव्र निदर्शने सुरू आहेत. देशातील अनिवार्य इस्लामिक वेशभूषेच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अमिनीला ताब्यात घेतले होते.

आंदोलक महिलांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या आणि त्यांचे हिजाब फेकून निषेध केला. बंद पुकारल्याने नुकसान टाळण्यासाठी काही भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. शनिवारी, संध्याकाळच्या बातम्यांच्या प्रसारणादरम्यान इराणची सरकारी वाहिनी १५ सेकंदांसाठी ‘हॅक’ करून, ‘हॅकर’नी देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे ज्वालांनी वेढलेले छायाचित्र प्रसारित करून, तरुणांच्या मृत्यूला जबाबदार धरणारा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. आंदोलकांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, आतापर्यंत या आंदोलनादरम्यान बारापेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. शेकडो आंदोलकांना अटक केल्याचे सांगितले जाते. मानवाधिकार संघटनांनी सांगितले, की उत्तरेकडील कुर्दीश वस्ती असलेल्या सानंदज शहरातील एका प्रमुख रस्त्यावर शनिवारी मोटारीमधील एका व्यक्तीवर गोळय़ा झाडण्यात आल्या.

सविनय कायदेभंग करणाऱ्यांवर गोळीबार 

फ्रान्समधील ‘कुर्दिस्तान ह्युमन राइट्स नेटवर्क अँड हेंगाव ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्स’ने सांगितले, की रस्त्यावर तैनात सुरक्षा दलांसमोर वाहनाचा भोंगा (हॉर्न) वाजवताना त्या व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली. इराणमध्ये वाहनाचे भोंगे (हॉर्न) वाजवून सविनय कायदेभंग केला जात आहे. कुर्दिस्तानच्या पोलीस प्रमुखांनी निदर्शकांवर गोळीबार केल्याच्या वृत्ताचे खंडन केले. मानवाधिकार संघटनांनी सांगितले, की शहरातील जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केला, त्यात आणखी एक निदर्शक ठार झाला व दहा जण जखमी झाले. राजधानी तेहरानमध्येही शनिवारी निदर्शने करण्यात आली.