सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतील कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यासाठी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. चेक वटवणूक, पैसे काढणे आणि जमा करणे यासह बॅंकेचे सर्वच कामकाज सोमवारी ठप्प झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये खाते असणाऱया ग्राहकांना कर्मचाऱयांच्या संपामुळे सोमवार आणि मंगळवार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
साप्ताहिक सुटीला जोडून सोमवारी आणि मंगळवारी बॅंक कर्मचाऱयांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्याला सोमवारी सकाळी प्रारंभ झाला. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बॅंका सोमवारी बंद असून, ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रांवर गर्दी केली आहे. इंडियन बॅंक असोसिएशनने कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करण्यास नकार दिल्यामुळे बॅंक कर्मचाऱयांनी दोन दिवसांचा संप पुकारला असल्याचे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सचे निमंत्रक एम. व्ही. मुरली यांनी सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या संपाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी यासह इतर बॅंकांचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.