जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ताफ्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जम्मू- काश्मीरमध्ये आता केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि भारतीस सैन्य अशा तिन्ही दलांचा ताफा एकाच वेळी निघणार आहे. ज्या मार्गावरुन हा ताफा जाईल, त्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. स्फोटकांनी भरलेल्या कारने ताफ्यातील बसला धडक दिली होती. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, जम्मू- काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य आणि बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात जवानांच्या ताफ्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

इंडियन एक्स्प्रेसला या बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली. जम्मू- काश्मीरमध्ये सैन्यासह सीआरपीएफ आणि बीएसएफ या निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या तिन्ही दलांचा ताफा सध्या स्वतंत्र जातो. मात्र, पुलवामा येथील हल्ल्यानंतर तिन्ही दलांचा ताफा आता एकाच वेळी निघणार आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक वारंवार बंद करावी लागणार नाही.  तिन्ही दलांचा ताफा एकत्र गेल्यास सुमारे महामार्गावरील प्रत्येक टप्प्यातील वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवली जाणार आहे. ज्या वेळी हा ताफा जाईल, त्या वेळेपुरतीच वाहतूक बंद केली जाणार आहे.

याशिवाय काझीगुंड येथे रात्री जवान मुक्काम करतील, असा देखील निर्णय घेण्यात आला. यासाठी काझीकुंड तळाचा विस्तार केला जाईल आणि या तळावरील सुरक्षा वाढवली जाईल. आधी एकाच दिवसात जवानांचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला यायचा. मात्र, आता या प्रवासाची आता दोन दिवसात विभागणी केली जाईल. काझीगुंड आणि बलिहाननंतरच्या भागात दहशतवादी हल्ल्यांची शक्यता जास्त आहे. या भागातील भौगोलिक परिस्थिती तशी आहे.  तसेच सर्व हल्ले हे दुपारी झाले. त्यामुळे आता या भागातून सकाळच्या वेळेतच ताफा जाईल. यासाठी काझीगुंड तळावर जवान मुक्काम करतील.

सीआरपीएफच्या ज्या ताफ्यावर हल्ला झाला तो ताफा जम्मूवरुन पहाटे साडे तीनच्या सुमारास निघाला होता आणि पुलवामा येथे दुपारी तीन वाजता पोहोचला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता जम्मूवरुन पहाटे निघणारा ताफा काझीगुंड तळावर पोहोचेल. तिथे रात्री मुक्काम करणार आणि तिथून सकाळी श्रीनगरसाठी रवाना होणार. श्रीनगर- काझीकुंड हे अंतर अडीच तासात गाठणे शक्य आहे. काझीकुंड तळावर सध्या एक हजार जवानांना मुक्काम करता येतो. त्याची क्षमता वाढवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

तसेच पुलवामा येथे एकाच वेळी 70 वाहनांचा ताफा निघाला होता. भविष्यात इतका मोठा ताफा नेण्याऐवजी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली जाईल. प्रवासात वेळ जास्त गेला तरी जवानांची सुरक्षा महत्त्वाची आहे. सर्व जवानांना बुलेट प्रुफ गाड्यांमधून नेण्यास आम्ही प्राधान्य देऊ, असे सूत्रांनी सांगितले.