Crime News : देशभरात दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. एवढंच नाही तर अनेक घटनांचे व्हिडीओही समोर येतात. संपत्तीचा वाद किंवा घरगुती हिंसाचार किंवा कधी-कधी किरकोळ वादातून थेट खून झाल्याच्याही घटना घडतात. आता अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना पंजाबच्या पटियालामध्ये घडली आहे.
पटियालामधील मल्लेवाल गावात एका व्यक्तीने पंख्यावरून झालेल्या किरकोळ वादातून आपल्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नातवाच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुलाचा खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येमागेचं कारण हे अत्यंत किरकोळ असून पंख्यावरून वाद झाला होता. मात्र, या वादानंतर राग अनावर झाला आणि वडिलांनी थेट मुलाचा खून केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
नेमकं घटना काय घडली?
२३ जुलै रोजी रात्री जगपाल सिंग (३५) यांचे वडील मलकीत सिंग (६५) यांनी धारदार हत्याराने जगपाल सिंग यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जगपाल सिंग यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जगपाल यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंब एकत्र जमलं होतं. मात्र, याचवेळी किरकोळ वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली. पंख्याला संरक्षक जाळी नसल्यावरून हा वाद सुरू झाला होता.
वृत्तानुसार, जगपाल यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंब एकत्र जमलं होतं. तेव्हा बाहेर पडताना जगपालने त्यांच्या वडिलांना पंखा बंद करण्यास सांगितलं होतं. कारण लहान मुले आणि कुटुंब एकत्र जमल्यामुळे एखादा मुलगा चुकून पंख्यात हात घालू शकतो. मात्र, यावरूनच जगपाल सिंग आणि त्यांचे वडील मलकीत सिंग यांच्यातील वाद वाढला. त्यानंतर ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितलं की, “मद्याच्या नशेत असलेल्या मलकीत सिंग यांनी त्यांचा मुलगा जगपाल सिंग हे झोपलेले असताना त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या डोक्यावर विळ्यासारख्या धारदार शस्त्राने तीन वेळा वार केले. या हल्ल्यात जगपाल हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.”
दरम्यान, जगपाल यांना दोन लहान मुले आहेत. यातील एकाच्या वाढदिवसीच त्याच्या वडिलांचा आजोबांनी खून केल्यामुळे हे दोन्ही चिमुकले अनाथ झाले आहेत. त्यामुळे क्रोधावर संयम किती महत्वाचा आहे, हे या घटनेतून दिसून येतं. दरम्यान, भाडसन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गुरप्रीत सिंग याांनी सांगितलं की, “कुटुंबातील सदस्यांच्या जबाबावरून त्यांनी मलकीत विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेतील पुढील तपास सुरू आहे.”