फरार झालेला खलिस्तानी समर्थक आणि ‘वारिस पंबाज दे’ चा सर्वेसर्वा अमृतपालच्या शोधासाठी पंजाब पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. पपलप्रित सिंग या त्याच्या जवळच्या साथीदाराला अटक केल्यानंतर पंजाब पोलिसांनी आता जोगा सिंगलाही सरहिंद येथून अटक केली आहे. हे दोघेही अमृतपालचे अतिविश्वासू साथीदार असल्याचं सांगितलं जात आहे. बॉर्डर रेंजचे डीआयजी नरिंदर भार्गव यांनी जोगा सिंगच्या अटकेविषयी आज माहिती दिली. अमृतसर ग्रामीण आणि होशियारपूर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तसंच, पंजाब पोलिसांनी जोगा सिंगचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.

गेल्या महिन्यात अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातातून निसटला. तो सातत्याने पोलिसांना चकवा देत असल्याने पंजाब पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी ‘ऑपरेशन अमृतपाल सिंग’ राबवलं असून त्याअंतर्गत त्यांनी वेगाने तपासकार्य सुरू केले आहे. त्यामुळे पपलप्रित सिंगला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता जोगा सिंगलाही अटक करण्यात आली आहे. साथीदार सापडत असताना मूळ आरोपी पोलिसांच्या तावडीत का सापडत नाही, असा सवालही पंजाब नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

वारिस पंजाब देच्या सदस्यांवर कारवाई

जोगा सिंग अमृतपालसोबत १८ ते २८ मार्च दरम्यान होता. जोगा सिंग यानेच अमृतपालला २७ मार्च रोजी पंजाबमध्ये परत आणले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतींदर सिंग यांनी दिली. लुधियानाचा रहिवासी असलेला जोगा हा उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील एका डेराचा प्रभारीसुद्धा होता. गेल्या महिन्यात पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ संघटनेच्या सदस्यांवर मोठी कारवाई केली. १८ मार्च रोजी अमृतपालने पोलिसांना चकवा देऊन पळ काढला. तो अजूनही फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

चौकशीसाठी वकील ताब्यात

दरम्यान, कपूरथला जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या राजदीप सिंग या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमृतापल सिंग प्रकरणी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली ही. या पोस्टसंदर्भात चौकशीसाठी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरून बार असोसिएशनने पंजाब पोलिसांचा निषेध व्यक्त करत एक दिवसीय संप पुकारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी दोघे अटकेत

अमृतपाल सिंगला आश्रय दिल्याच्या आरोपावरून शुक्रवारीही दोघांना अटक करण्यात आली. होशियारपूर जिल्ह्यातील बाबक गावातील राजदीप सिंग आणि जालंधर जिल्ह्यातील सरबजीत सिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. राजदीप सिंग आणि सरबजीत सिंग या दोघांनाही शुक्रवारी रात्री दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.