Punjab three ministers discuss Sweden Goa cruise trips during flood inspection : पंजाबमध्ये सध्या अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान पंजाबच्या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये पूराची पाहणी करण्यासाठी गेलेले मंत्री हे चक्क त्यांच्या गोवा आणि स्वीडन येथील क्रूझ ट्रीपची चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील हा व्हिजीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याबरोबरच काँग्रेस आणि भाजपाने भगवंत मान सरकारवर यावरून टीका केली आहे.

या व्हिडीओमध्ये मंत्री लालजीत सिंग भुल्लर, हरभजन सिंग आणि बरिंदर कुमार गोयल हे एका बोटीत लाईफ जॅकेट घालून बसलेले पाहायला मिळत आहेत. हे तीन मंत्री या भागात पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीची पाहाणी करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ मूळ भुल्लर यांच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आलेल्या लाइव्हस्ट्रीमचा आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना हे करण्यात आले होते. पण या तीनही मंत्र्यांना लाइव्हस्ट्रीम सुरू असल्याबद्दल कसलीच कल्पना नव्हती, आणि यादरम्यान ते स्वीडन आणि गोवा येथील क्रूझ ट्रीपबद्दल चर्चा करू लागले.

“मी स्वीडनमध्ये क्रूझला गेलो होतो. तुम्ही २४ तास जहाजावरच राहू शकता कारण तेथे हॉटेलपासून ते इतर सगळी सोय असते,” असे म्हणताना सिंग ऐकू येत आहेत. त्यांच्यानंतर गोयल के या ट्रीपबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ज्यावर भुल्लर ते गोव्यासारखेच होते असे उत्तर देताना ऐकू येत आहेत.

लाइव्हस्ट्रीम केल्यानंतर त्याच खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये मंत्री नागरिकांना पंजाब राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आणि सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत आहेत.

भुल्लर हे पंजाब सरकारमध्ये वाहतूक मंत्री आहेत, सिंगग हे इमारती आणि रस्ते मंत्री आहेत, तर गोयल हे जलसंपदा मंत्री आहेत. या तिघांना राज्यात पूर आलेल्या जिल्ह्यांसाठी पूर मदत प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मंत्र्यांमधील या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, ज्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पंजाबमधील किमान आठ जिल्ह्यांमध्ये पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या केंद्रीय संस्था राज्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनंतर आर्मी, बीएसएफ, भारतीय हवाई दल, एनडीआरएफ यांना राज्यात बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.