निक्षारीकरण तंत्रज्ञान सौरऊर्जेच्या मदतीने वापरून  भारतात पाणीटंचाई असलेल्या भागात पेयजल उपलब्ध करता येईल असे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने म्हटले आहे. भारतातील ६० टक्के भूजल हे क्षारमिश्रित आहे व ते खेडय़ांमध्ये आहे पण तेथे रिव्हर्स ऑसमॉसिस प्रक्रियेने पारंपरिक निक्षारीकरण प्रकल्प राबवणे अवघड आहे कारण तिथे वीज ऊपलब्ध नाही. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील संशोधक नताशा राईट व अमॉस विंटर यांनी असे दाखवून दिले की, इलेक्ट्रोडायलिसिस तंत्राने क्षारयुक्त खारट भूजल पेयजलात रूपांतर करता येईल. इलेक्ट्रोडायलिसिस तंत्रात सौर पॅनेल्स वापरले जातात व त्यामुळे खेडय़ात स्वच्छ पेयजल मिळू शकते. क्षारयुक्त भूजलाच्या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न आम्ही केले असून सध्या बाजारात असलेल्या यंत्रांच्या मर्यादाही लक्षात घेतल्या आहेत असे सांगून विंटर यांनी सांगितले की, भारतातील सध्याच्या तंत्रज्ञानाचा आढावा आम्ही घेतला असून त्यावर साकल्याने विचार करून इलेक्ट्रोडायलिसिस ही पद्धत वापरता येईल.
भारतात पाण्याची क्षारता लिटरला ५०० ते ३००० मिलिग्रॅम असून ती कमी करता येईल. सागरी जलाची क्षारता लिटरला ३५ हजार मिलिग्रॅम असते.
खेडय़ात भूजल इलेक्ट्रोडायलिसिसने पाण्याचे निक्षारीकरण करण्यासाठी वीज उपलब्ध नाही त्यामुळे तेथे सौर ऊर्जा वापरता येईल. क्षारयुक्त किंवा खारट पाणी हे थेट विषारी नसते पण त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात. सौर पॅनेलच्या मदतीने इलेक्ट्रोडायलिसिस करणे शक्य असून त्यात किफायतशीरपणा आहे व दोन ते पाच हजार लोकांना पुरेल इतके पाणी त्यात पेयजलाच्या रूपात तयार करता येते. हे पाणी रोगजंतू मुक्त असून त्याने लोक आजारी पडणार नाहीत, असे डिसॅलिनेशन जर्नलमधील संशोधन अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रोडायलिसिस म्हणजे काय
इलेक्ट्रोडायलिसिस म्हणजे भूजलाचा खारट पाण्याचा प्रवाह दोन विरुद्ध भारित इलेक्ट्रोड्समध्ये फिरवला जातो. भूजल किंवा क्षारयुक्त पाण्यात धन व ऋण आयन असतात त्यांना इलेक्ट्रोड ओढून घेतात व स्वच्छ पाणी मध्यभागी राहते. त्यात अनेक अर्धपारपटलेही वापरलेली असतात, ती रिव्हर्स ऑसमॉसिस पद्धतीतही वापरतात पण इलेक्ट्रोडायलिसिस पद्धतीत त्यांना जास्त दाब सहन करावा लागत नाही. त्यामुळे ही खर्चिक अर्धपारपटले जास्त काळ टिकतात व त्यांची निगा कमी राखावी लागते. इलेक्ट्रोडायलिसिस पद्धतीत ९० टक्के पाणी उपलब्ध होते. रिव्हर्स ऑसमॉसिस पद्धतीत केवळ ४० ते ६० टक्के पाणी उपलब्ध होते, पाण्याची टंचाई असताना या तंत्राचा हा फार मोठा फायदा आहे. राईट व विंटर यांनी त्यांचे इलेक्ट्रोडायलिसिस उपकरण भारतात वापरायचे ठरवले आहे. लष्करी वापरासाठी किंवा आपत्ती निवारणाच्या दूरस्थ ठिकाणी हे तंत्र वापरता येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pure drinking water produce with help of solar energy in india
First published on: 10-09-2014 at 01:01 IST