Trump-Putin Meet In Alaska: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांची आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची काल आलास्कामध्ये पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यासोबत उभे राहून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, २०२० च्या निवडणुकीनंतर ट्रम्प जर व्हाइट हाऊसमध्ये राहिले असते, तर युक्रेनमधील युद्ध सुरूच झाले नसते, असे त्यांना वाटते.

“आज, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की जर ते २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष असते, तर युद्ध झालेच नसते आणि मला खात्री आहे की हे खरे आहे. मी याला दुजोरा देऊ शकतो”, असे पुतिन म्हटल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांनी अलास्कामध्ये चर्चा केली. ही चर्चा सुमारे तीन तास चालली आणि त्यात प्रामुख्याने रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी या चर्चेचे वर्णन “अत्यंत सकारात्मक” असे केले परंतु चर्चेतून कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचा अर्थ असा की, युद्धबंदीवर कोणताही करार झाला नाही.

पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीचे वर्णन एका तोडग्याच्या दिशेने एक सुरुवात म्हणून केले आणि दोन्ही नेत्यांमधील पुढील बैठक मॉस्कोमध्ये व्हावी असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सुचवले. पुतिन म्हणाले की, ते आणि ट्रम्प युक्रेन मुद्द्यावर ‘समंजसपणा’वर पोहोचले आहेत. त्यांनी युरोपला यात कोणतेही अडथळे निर्माण करू नये असा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले की, ते लवकरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी बोलतील.

‘एका गोष्टीमुळे’ करार नाही

फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, अलास्काच्या अँकरेज येथे झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युक्रेन युद्धावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी करार होण्यापासून रोखणारी एक गोष्ट होती. पण, कोणत्या एका गोष्टीमुळे करार होऊ शकला नाही हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले की, युक्रेनसोबतचे युद्ध तेव्हाच संपू शकते जेव्हा या युद्धाचे खरे कारण समजेल. तुमच्या माहितीसाठी, जेव्हा पुतिन यांनी तीन वर्षांपूर्वी हे युद्ध सुरू केले तेव्हा फक्त एकच उद्देश होता, युक्रेनचा नाश करणे, त्याचे सैन्य नष्ट करणे. आता जेव्हा पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, त्यांनी थेट काहीही सांगितले नाही, परंतु हे निश्चितपणे सांगितले गेले की युद्ध कोणत्या उद्देशांनी सुरू झाले हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.