बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा, या मागणीचा स्वातंत्र्यदिनानिमित्त पुनरुच्चार करतानाच, तुकडय़ा-तुकडय़ाने मदत दिल्याचा राज्याला काहीही उपयोग होणार नाही असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.बिहारचा नक्कीच विकास होणार असून तो येथील लोकांच्या परिश्रमामुळे होईल. कुणाचे आशीर्वाद किंवा दया यामुळे बिहार विकसित होणार नाही. केंद्र सरकारला काही द्यायचेच असेल, तर राज्याला विशेष दर्जा द्या, जेणेकरून राज्याची वेगाने प्रगती होईल, असे ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात झेंडावंदन केल्यावर नितीश म्हणाले.आम्हाला तुमच्याकडून पैसा नको आहे. आम्हाला केवळ विशेष दर्जा द्या आणि बाकीचे तुमच्याकडे ठेवा. विशेष दर्जामुळे बिहारच्या उद्योजकांना करसवलती मिळतील, कारखान्यांमध्ये गुंतवणूक होईल आणि नोकऱ्यांसाठी इतर राज्यांमध्ये जाण्यास भाग पडणाऱ्या लाखो युवकांना नोकऱ्यांची संधी मिळेल, असे प्रतिपादन कुमार यांनी केले.