कुतुब मीनारच्या पूजेची मागणी करणाऱ्या हिंदू पक्षांच्या याचिकेला आर्केलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (ASI) ने विरोध केला आहे. दिल्ली न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेनंतर कुतुब मिनार स्मारक असून, त्याची ओळख बदलली जाऊ शकत नसल्याचे मत एएसआयने व्यक्त केले आहे.

एएसआयकडून याचिकेला विरोध
कुतुब मिनार स्मारकात हिंदू देवी देवतांची मुर्ती असल्याचा दावा काही हिंदू गटांनी केला होता. या मूर्तीची पूजा करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हिंदू गटांनी दिल्ली न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज दिल्लीतील साकेत न्याययात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान एएसआयने कुतुब मिनार एक स्मारक असून तिथे कोणत्याही धर्माची पूजा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचे म्हणले आहे. १९१४ साली कुतुब मिनारला संरक्षित स्मारकाचे स्थान मिळाले आहे. तेव्हापासून इथे कोणत्याही प्रकारची पूजा करण्यात आली नसून यापुढेही इथे पूजा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कुतुब मिनारची ओळख बदलली जाऊ शकत नसल्याचेही एएसआयने म्हणले आहे.

कोणत्याही धर्माची पूजा करण्यास बंदी
या स्मारकाला पुरात्व महत्व आहे. पुरात्विक संरक्षण १९५८ च्या कायद्यानुसार या भागात फक्त पर्यटनाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच जेव्हापासून कुतुबमिनार परिसर एएसआयच्या संरक्षण अधिपत्याखाली आला आहे तेव्हापासून कोणत्याही धर्माची पूजा याठिकाणी करण्यात आली नसल्याचा दावाही एएसआयने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुतुब मिनार परिसरात २७ मंदिरांचे १०० पेक्षा जास्त अवषेश असल्याचा दावा
याचिका दाखल करणारे हरिशंकर जैन यांनी कुतुब मिनार परिसरात २७ मंदिरांचे १०० पेक्षा जास्त अवषेश असल्याचा दावा केला आहे. तसेच याबाबत आमच्याकडे असणारे पुरावे हे एएसआयच्या पुस्तकातूनच घेतले असल्याचे मत जैन यांनी व्यक्त केले आहे. जैन यांनी दावा केला आहे, की मोहम्मद गौरीच्या सैन्य प्रमुख कुतुबुद्दीन एबकने या परिसरातील २७ मंदिरांना उद्वस्थ केले होते. तसेच कुतुब मिनार परिसरात गणपती, विष्णू देवांचे फोटो आहेत. तसेच विहिरींसोबत कमळाचे प्रतीक असल्याचा दावाही करण्यात आला आहे.