करोना संकटामुळे टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्या कुटुंबावर कठीण वेळ ओढावली आहे. एक, दोन नव्हे तर अश्विनच्या कुटुंबातील तब्बल १० जणांना करोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यात ४ लहानग्यांचाही समावेश आहे. अश्विनची पत्नी प्रिथी अश्विन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली भीषण परिस्थिती कथन केली.

”तुम्हाला हॅलो बोलण्याइतपत मला बरं वाटत आहे. गेला संपूर्ण आठवडा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता…एकाच आठवड्यात कुटुंबातील सहा माणसं आणि चार लहान मुलांना करोनाचा संसर्ग जडलाय, सर्वजण घरी किंवा विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत…मला वाटतं या आजारानंतर येणारा शारीरिक अशक्तपणा आपण भरून काढू शकतो, परंतु मानसिक आरोग्य स्थिर होण्यास वेळ लागेल. पाचव्या ते आठव्या दिवसापर्यंतचा कालावधी माझ्यासाठी सर्वात वाईट होता…मदतीसाठी सर्वजण जवळ होते…पण परिस्थिती अशी असते की सगळे सोबत असूनही तुमच्यासोबत कुणीचं नसतं…”अशा आशयाचं ट्विट करत अश्विनच्या पत्नीने कुटुंबावर ओढावलेल्या कठीण परिस्थितीबाबत माहिती दिलीये. यासोबतच सर्वांनी लस घ्या…करोनाविरोधात लढण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे…असा सल्लाही अश्विनच्या पत्नीने दिलाय.


दरम्यान, अश्विनने काही दिवसांपूर्वीच आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. “आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन ”अशी माहिती अश्विनने दिली आहे.