पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. पुन्हा नव्याने करार करण्याबाबत द्रविड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ‘बीसीसीआय’ आता द्रविडला कायम ठेवण्यापेक्षा नवा प्रशिक्षक नेमण्याच्या पक्षात असल्याचे समजते. मुख्य प्रशिक्षकपदासाठी सध्या व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव चर्चेत आहे.

द्रविडच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली. मात्र, भारताला ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा जिंकता आली नाही. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने सलग १० सामने जिंकत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अखेर ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेनंतर द्रविडचा करार संपुष्टात आला.

हेही वाचा >>>Ind vs Aus: धावांच्या शर्यतीत गोलंदाजांची कमाल; भारताची

‘‘द्रविड आणि ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली आहे. तो जो निर्णय घेईल, त्याचा आम्ही आदर करू. ट्वेन्टी-२० विश्वचषकाला ७-८ महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाकडे संघबांधणीसाठी आणि योजना आखण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आम्ही याबाबत अजून चर्चा करत आहोत. अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल अशी आशा आहे,’’ असे ‘बीसीसीआय’मधील पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. आता नव्या प्रशिक्षकाची निवड करायची झाल्यास लक्ष्मणला पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.