Rahul Gandhi Attacks PM Modi In Bihar Rally: बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करताना, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आणि ते “मतांसाठी काहीही” करत असल्याचा आरोप केला.
“जर तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले, तर ते व्यासपीठावर नाचतील”, असे राहुल गांधी यांनी मुझफ्फरपूरमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासोबत एका संयुक्त सभेत बोलताना म्हटले.
विधानसभा निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला असताना, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. बिहारी लोकांसाठी सर्वात मोठा सण असलेल्या छठ पूजेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, भाविक दिल्लीतील प्रदूषित यमुनेत प्रार्थना करत होते, तर पंतप्रधानांनी खास त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष तलावात डुबकी मारली.
“नरेंद्र मोदी त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये स्नान केले. त्यांचा यमुनेशी काहीही संबंध नाही. त्यांचा छठ पूजेशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत”, अशी टीका राहुल गांधींनी केली.
“नीतीशजींचा चेहरा वापरला जात आहे. पण, रिमोट कंट्रोल भाजपाच्या हातात आहे. तुम्ही असा विचार करू नका की ते सर्वात मागासलेल्या लोकांचा आवाज ऐकतात. भाजपाच्या हातात रिमोट कंट्रोल आहे आणि त्यांचा सामाजिक न्यायाशी काहीही संबंध नाही”, असे राहुल गांधी नितीश कुमारांबाबत बोलताना म्हणाले.
यावेळी राहुल गांधींनी बिहारमध्येही असाच प्रयत्न होऊ शकतो असा इशारा देत, मतचोरीचा आरोप पुन्हा केला. ते म्हणाले, “ते तुमची मते चोरण्यात गुंतले आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी केली आणि ते आता बिहारमध्येही मतचोरीचा प्रयत्न करतील.”
पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांना लक्ष्य करत राहुल गांधींनी असा दावा केला की, भाजपा सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीद्वारे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत.
“तुमच्या फोनच्या मागे काय लिहिले आहे ते सांगा?” असे राहुल गांधींनी उपस्थितांना विचारले. “मेड इन चायना. आम्ही म्हणतो की ते मेड इन चायना नसावे, ते मेड इन बिहार असावे. मोबाईल, शर्ट, पॅन्ट सर्व काही बिहारमध्ये बनवले पाहिजे, जेणेकरून तरुणांना नोकऱ्या मिळतील,” असे ते म्हणाले.
