भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रवास करत आहेत. सध्या भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात असून काश्मीरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे. यादरम्यान गेल्या काही महिन्यांत राहुल गांधी राजकीय, सामाजिक वर्तुळात आणि सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘करली टेल’नं राहुल गांधींची मुलाखत घऊन राजकारणाव्यतिरिक्तही त्यांच्या आयुष्याचे इतर पैलूंबाबत विचारणा केली. यावर राहुल गांधींनीही कोणतेही आढेवेढे न घेता उत्तरं दिली. यामध्ये खूप राग आल्यावर राहुल गांधी काय करतात, यावर त्यांनी राग व्यक्त करण्याची पद्धत सांगितली. तसेच, राजकारणात का आले, याविषयीही भाष्य केलं आहे.
राजकारणात येण्यामागची प्रेरणा?
राजकारणात येण्यामागची प्रेरणा काय होती? या प्रश्नावर राहुल गांधींनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “मी एका अशा कुटुंबातून येतो, ज्याचा राजकारणाशी फार जवळचा संबंध आहे. आमच्या कुटुंबात आम्ही नेहमीच राजकारणावर चर्चा करायचो. जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा आज्जी आणि बाबांसोबत डायनिंग टेबलवर चर्चा असायची ती भारत आणि राजकारण यावर. याच विषयांसमवेत आम्ही मोठे झालो. त्याशिवाय माझ्या आज्जीच्या आणि माझ्या वडिलांच्या निधनाचाही बराच परिणाम झाला. राजकारणात जावं असं तेव्हा वाटण्यामागे ही कारणंही होती. त्यानंतर माझं मत कदाचित बदललं”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
“खूप राग येतो तेव्हा…”
“खूप राग आला तर मी शांत होतो. किंवा मी फक्त एवढंच म्हणतो की असं करू नका. पण माझ्याकडे त्याचं एक तंत्र आहे. मी ते माझी आई, बहीण आणि माझ्या जवळच्या लोकांवर वापरतो. जेव्हा केव्हा माझा त्यांच्याशी वाद होतो, तेव्हा मी तसं करतो. माझ्या आईशी माझा वाद झाला तर मी त्यांना मेसेज पाठवतो.. ‘हे बघ आई, तू माझी आई आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला खूप काही देणं लागतो. त्यामुळे मी या भांडणात पडू शकत नाही. तुझं बरोबर आहे. हे खरं आहे. जर तुम्ही कुणावर खरंच प्रेम करता, तर त्यांच्याशी भांडण्यात काहीच हशील नाही. तुम्ही कधीही नंतर त्यांच्याशी जाऊन बोलू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे, मी माघार घेतो”, असं राहुल गांधी म्हणाले.
Video: राहुल गांधींनी २५व्या वर्षी केली होती पहिली नोकरी; लंडनमधल्या कंपनीत मिळत होता ‘इतका’ पगार!
“प्रियांका माझ्यापेक्षा लहान आहे.आमची भांडणं व्हायचं अनेकदा. खूप मोठी भांडणंही व्हायची. पण बाबांच्या निधनानंतर आम्ही ते सगळं थांबवलं. त्यानंतर थोडेफार वाद होतात. पण ते फार काही मोठं नसतं”, असंही राहुल गांधींनी सांगितलं.