Rahul Gandhi On Election Commission : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली होती. तसेच मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर देशभरात खळबळ उडाली होती. राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले.
तसेच राहुल गांधींनी केलेल्या मत चोरीच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने राहुल गांधींनाच इशारा दिला होता. मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर करण्यात आल्याने हा भारतीय संविधानाचा अपमान असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं होतं. तसेच राहुल गांधींनी मत चोरीच्या आरोपांबाबत ७ दिवसांत शपथपत्र सादर करावं किंवा देशाची माफी मागावी, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आता राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या तीनही आयुक्तांना मोठा इशारा दिला आहे. ‘तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट नीट समजून घ्यावी, जर तुम्ही तुमचं काम केलं नाही तर इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल’, असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.
#WATCH | Bihar: At 'Voter Adhikar Yatra' in Gaya, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "…When they do 'vote chori', they attack this soul (Constitution), they attack the Constitution, they attack Bharat Mata. We will let neither Narendra Modi nor the Election… pic.twitter.com/r1eE4us2Vu
— ANI (@ANI) August 18, 2025
राहुल गांधी काय म्हणाले?
बिहारमधील मतदार अधिकार यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा ते ‘मत चोरी’ करतात तेव्हा ते या आत्म्यावर (संविधानावर) हल्ला करतात. ते संविधानावर हल्ला करतात, ते भारतमातेवर हल्ला करतात. मात्र, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा निवडणूक आयोगाला यावर हल्ला करू देणार नाही. हे संविधान कोणीही मिटवू शकत नाही. निवडणूक आयुक्तांनो एक गोष्ट नीट समजून घ्या, जर तुम्ही तुमचं काम केलं नाही तर इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
VIDEO | Voter Adhikar Yatra: Addressing a public gathering in Gayaji, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi (@RahulGandhi) says, "You all have seen that whatever I say, I stand by it. You all know that I never speak a lie from the stage. I want to tell the three Election… pic.twitter.com/AV66ixSRxR
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2025
इंडिया आघाडी महाभियोग प्रस्ताव आणणार?
राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांना निवडणूक आयोगाने काही नेते मतदारांची दिशाभूल करत असल्याचं म्हटलं. मात्र, निवडणूक आयोग अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही. तसेच मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर करण्यात आल्यामुळे हा भारतीय संविधानाचा अपमान असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. तसेच राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपांबाबत सात दिवसांत शपथपत्र सादर करावं किंवा देशाची माफी मागावी असा इशारा निवडणूक आयोगाने दिला.
निवडणूक आयोगाने केलेल्या या टिकेनंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे. कारण इंडिया आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेतील खासदार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना आयोगाने काय म्हटलं?
“जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या मतदारांना लक्ष्य करत राजकारण केले जाते, अशावेळी निवडणूक आयोग प्रत्येकाला स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुण यासह सर्व स्तरातील, सर्व धर्माच्या सर्व मतदारांबरोबर कोणताही भेदभाव न करता खंबीरपणे उभा आहे.” पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य ही संविधानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे, तसेच मत चोरी यासरखे शब्द हे लोकशाही संस्थांना कमकुवत करतात असेही निवडणुक आयुक्त म्हणाले.