भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे-तुकडे करून टाकण्याची धमकी देणा-या सहारनपूरचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार इम्रान मसूद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. इम्रान मसूद यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर धार्मिक तेढ पसरवल्याच्या आरोपाखाली शनिवारी सकाळी इम्रान मसूद यांना पोलिसांनी अटक करत त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. इम्रान मसूद यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसविरोधी टीकेची चांगलीच झोड उठली होती. त्यामुळे इम्रान मसूद यांना अटक झाल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सहारनपूर मतदारसंघातील प्रचारसभासुद्धा रद्द करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशचा गुजरात करायचा प्रयत्न केल्यास आपण त्यांची खांडोळी करू , तसेच आपल्याला मरणाची अथवा कोणावरही हल्ला करण्याची भीती वाटत नसल्याचे वक्तव्य इम्रान मसूद यांनी केले होते. निवडणूक आयोगानेही या भाषणाची गंभीर दखल घेतली आहे. मसूद यांच्या भाषणाची निवडणूक आयोगाने चौकशी सुरु केली असून या भाषणाची सविस्तर माहिती मागविली आहे. दरम्यान भाजपकडून इम्रान मसूद यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.