Rohan Jaitley Reply to Rahul Gandhi : दिल्ली व जिल्हा क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी राहुल गांधींवर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी रोहन जेटली यांचे वडील, दिवंगत भाजपा नेते अरुण जेटली यांच्याबद्दल केलेल्या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. जेटली म्हणाले, “राहुल गांधी यांनी माझ्या दिवंगत वडिलांबाबत खोटे दावे केले आहेत.” राहुल गांधी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले होते की “आम्ही कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असताना भाजपाने मला धमकावण्याचा प्रयत्न केला. भाजपाने मला धमकावण्यासाठी अरुण जेटली यांना पाठवलं होतं. त्यानंतर जेटली माझ्याकडे आले आणि यांनी माझ्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता.”
रोहन जेटली यांनी राहुल गांधी यांचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी माझ्या वडिलांबाबत जे काही बोलत आहेत ते खोटं आहे.
रोहन जेटली काय म्हणाले?
रोहन जेटली यांनी म्हटलं आहे की “राहुल गांधी दावा करत आहेत की काँग्रेस कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असताना माझ्या दिवंगत वडिलांनी राहुल यांना धमकावलं होतं. परंतु, मला त्यांना काही गोष्टी अवगत करून द्यायच्या आहेत. २०१९ मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि कृषी कायदे २०२० मध्ये सादर करण्यात आले होते. मग माझ्या वडिलांनी त्यांना कृषी कायद्यांवरून कसं धमकावलं. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही विरोधकाला धमकावण्याचा माझ्या वडिलांचा स्वभाव नव्हता. ते लोकशाही मानणारे व जपणारे व्यक्ती होते.”
रोहन जेटलींकडून मनोहर पर्रिकरांचा उल्लेख
अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली म्हणाले, “एखाद्या वेळी अवघड परिस्थिती निर्माण जरी झाली असती (जशी राजकारणात नेहमी निर्माण होते) तरी माझ्या वडिलांनी सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी मुक्त व खुल्या चर्चेचं आवाहन केलं असतं. ते नेहमी याच धोरणावर काम करत होते. ते असेच होते आणि त्यामुळेच आजही ते लोकांच्या स्मरणात आहेत. जे लोक हयात नाहीत त्यांच्यावरून राहुल गांधी राजकारण करतात. दिवंगत भाजपा नेते मनोहर पर्रिकर यांच्या अंतिम काळातही राहुल यांनी असाच प्रयत्न केला होता. त्यांच्या अखेरच्या काळाचं राजकारण केलं गेलं, जे अत्यंत वाईट होतं. त्यांच्या दिंवगत आत्म्यास शांती लाभो.”