पीटीआय, नवी दिल्ली
आशा ही वैश्विक भाषा आहे असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी व्यक्त केले. राहुल सध्या दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी विद्यार्थ्यांबरोबर गाठीभेटी, चर्चेची काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली.
राहुल गांधी यांनी या छायाचित्रांबरोबर पोस्टमध्ये लिहिले की, “कोलंबियाचे कम्युन आणि मेडेली-एन विद्यापीठाच्या वर्गशाळांपासून पेरु देशातील लिमामधील विद्यार्थ्यांबरोबर केलेल्या चर्चा, दक्षिण अमेरिकेचा हा दौरा आत्मीयता, आनंद आणि कल्पनांनी भरलेला आहे. मी प्रतिकार म्हणून रंगांचा वापर करणाऱ्या चित्रकारांना भेटलो, निर्भीडपणे स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सृजनशीलता आणि धाडसाचे चैतन्य खरोखर प्रेरणादायी होते.” राहुल गांधी यांचा दौरा सात दिवसांचा असून, ते कोलंबियाबरोबर ब्राझील, पेरु आणि चिली या देशांना भेट देत आहेत.
प्रत्येक पावलावर मला स्मरण होत होते की, आशा ही वैश्विक भाषा आहे. भिन्न खंडांमध्ये आमचा सन्मान आणि लोकशाहीसाठी लढा अगदी एकसमान आहे. – राहुल गांधी