राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असा आरोप भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी केला आहे. मध्य प्रदेशातल्या परिस्थितीलाही तेच जबाबदार होते. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठं होऊ देत नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती. आता सचिन पायलट यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- अशोक गेहलोत यांचा १०२ आमदारांचा दावा चुकीचा, इथे २५ माझ्यासोबत बसले आहेत – सचिन पायलट

आणखी वाचा- राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निटकवर्तीयांवर आयकर छापे, भाजपाचा डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप

राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता आली तेव्हा अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. तेव्हापासूनच सचिन पायलट हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्यासोबत १०२ आमदार आहेत हा जो दावा केलाय तो चुकीचा आहे असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. माझ्यासोबत २५ आमदार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राजस्थानमध्ये अस्थिर स्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असं आता भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राजस्थानात कमळ फुलणं इतकं सोपं नाही कारण…

काँग्रेसने काय म्हटलं आहे?

बंडाचा झेंडा हाती घेतलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाने कितीही षडयंत्र रचलं तरी राजस्थानमधील सरकार मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.