उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रियांका गांधी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. पण २०१७ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, राहुल गांधींसह इतर अनेक काँग्रेस नेत्यांना प्रियंकाला पक्षाचा चेहरा बनवण्याची इच्छा नव्हती. प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. प्रशांत यांनी सांगितले होते की राहुल गांधी यांच्याशी त्यांची पहिली भेट पाटण्यात झाली होती. इथेच राहुल गांधींनी त्यांना उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेससाठी काम करण्याची ऑफर दिली.

उत्तर प्रदेश निवडणुकांची आठवण करून देताना प्रशांत किशोर यांनी ‘द लॅलान्टॉप’ शी बोलताना भाष्य केले होते. “आधी मी या ऑफरबद्दल थोडा गोंधळलो होतो. साहजिकच मी माझ्या सहकाऱ्यांचा सल्ला घेतला असावा. ते म्हणाले होते की जर उत्तर प्रदेश जिंकले तर यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मी सुमारे तीन महिने काम केले आणि काँग्रेससाठी एक योजना बनवली. मात्र, सुरुवातीला राहुल गांधी काही गोष्टींसाठी तयार नव्हते,” असे प्रशांत किशोर म्हणाले.

“जेव्हा मी संपूर्ण योजना काँग्रेससमोर ठेवली तेव्हा त्यांच्या मते काही गोष्टी आक्षेपार्ह होत्या. जसे प्रियांका गांधींना पक्षाचा चेहरा बनवणे आणि सोनिया गांधींकडून संपूर्ण मोहीम सुरू करणे. तीन महिने चर्चा झाली आणि जूनमध्ये त्यांनी माझे ऐकले. मग पुन्हा प्रचाराला सुरुवात झाली आणि याचा पुरावा म्हणजे जमिनीवर काँग्रेसची चांगली हवा होती. पण समाजवादी पक्षाशी युती ही सर्वात घातक चाल असल्याचे सिद्ध झाले,” असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसपासून दूर जायचे होते असे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत म्हटले होते.’मी कधीच काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील युतीच्या बाजूने नव्हते. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटले की जर पक्षाने सपासोबत निवडणूक लढवली तर ते फायदेशीर ठरेल. हे घडले नाही आणि माझी एकमेव चूक आहे की माझी इच्छा नसतानाही मी स्वतःला काँग्रेसपासून वेगळे केले नाही, असे किशोर यांनी म्हटले होते.

२०१७ मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला ७ जागा आणि समाजवादी पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी भाजपाला उत्तर प्रदेश मध्ये ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले.