पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या वक्तव्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वाक-युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांच्या बाथरुममध्ये डोकावून पाहण्याची सवयच आहे असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींना लोकांच्या जन्मपत्रिका पाहण्याचा पण छंद असल्याची टीका राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेदरम्यान केली. फक्त पंतप्रधान मोदींनाच गुगलचा वापर कसा करायचा हे देखील माहित आहे असे ते म्हणाले.

गेल्या ३५ वर्षांपासून महत्त्वपूर्ण लोकांमध्ये उठबस केलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर एकही आरोप नाही. बाथरुममध्ये रेनकोट घालून स्नान करण्याची कला फक्त मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे असे मोदींनी म्हटले होते. त्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी सभागृहाचाही त्याग केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे प्रचार सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसचा एक नेता पोरकटपणा करत आहे. पक्षातील नेतेच त्याचे काही ऐकत नाही, असा अप्रत्यक्ष टोला मोदी यांनी राहुल गांधी यांना लगावला होता. जर तुम्ही गुगलवर जाऊन पाहिले तर या नेत्यावर केवळ जोक्स आणि मेमेज दिसतील असे मोदी म्हणाले होते. त्यामुळेच मोदी यांना गुगलचा वापर करता येतो असा टोला राहुल यांनी लगावला आहे. राहुल यांच्यापासून त्यांच्याच पक्षातील नेते दूर पळतात परंतु अशा नेत्यांना अखिलेश यांनी जवळ केले आहे असे ते म्हणाले.

आज उत्तर प्रदेशात लखनौमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी दोन्ही पक्षांचा मिळून वचननामा जाहीर केला आहे. दोन्ही पक्ष या १० मुद्दांवर एकत्र आल्याचे अखिलेश आणि राहुल यांनी म्हटले.  यावेळी मोदींनी अखिलेश यादव सरकारवरही टीकास्त्र सोडले. निरपराध लोकांना तुरुंगात टाकून अखिलेश यादव यांनी कायद्याचा दुरुपयोग केला, असा आरोप मोदी यांनी केला होता.