पीटीआय, कारगिल, नवी दिल्ली : लडाखच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा चीनबरोबरचा सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला. चीनने लडाखमधील भारताची हजारो किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आहे, दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांबरोबरच्या बैठकीत पूर्णपणे खोटी माहिती दिली असा आरोप राहुल यांनी केला. त्यावर, राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि निरर्थक असल्याचे उत्तर भाजपने दिले.

राहुल गांधी गेल्या नऊ दिवसांपासून लडाखच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी कारगिलमध्ये सभा घेतली आणि स्थानिकांशी संवाद साधला. भाषणात ते म्हणाले की, ‘गेल्या एक आठवडय़ात मी माझ्या मोटारसायकलवरून संपूर्ण लडाख फिरलो. लडाख हे डावपेचांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. मी पँगाँग सरोवरावर होतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की चीनने भारताची हजारो एकर जमीन ताब्यात घेतली आहे. दुर्दैवाने विरोधी पक्षांबरोबरच्या बैठकीत पंतप्रधानांनी ‘पूर्णपणे खोटे’ सांगितले की, आपली एक इंचही जमीन घेतली गेलेली नाही’.

राहुल यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. राहुल गांधी यांना निराधार, निरर्थक विधाने करायची सवय आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. उलट काँग्रेसनेच चीनबरोबर व्यवहार करताना ‘ऐतिहासिक, अक्षम्य गुन्हे’ केले आहेत असा आरोप त्रिवेदी यांनी केला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९५२ साली चीनला साडेतीन हजार टन तांदळाचा पुरवठा केला होता, डोकलाम समस्येच्या वेळी राहुल गांधी चीनच्या राजदूतांना भेटले होते असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. लडाखच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी सीमाप्रश्न दुसऱ्यांदा उपस्थित केला आहे.

‘कारगिल ही शौर्यगाथा’

कारगिलमध्ये राहुल यांनी १९९९ च्या कारगिल युद्धाचे स्मरण करत भारतीय सैनिकांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, ‘कारगिल हे केवळ एक स्थान नाही, ती एक शौर्यगाथा आहे. या भूमीवर आपले अनेक सैनिक कामी आले. ही भारताची अभिमानाची भूमी आहे आणि सर्व भारतीयांनी देशाबद्दल त्यांच्या असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देते’.

लडाखमधील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की चीनने आपली जमीन घेतली आहे आणि पतंप्रधान खरे बोलत नाहीत. – राहुल गांधी, नेता, काँग्रेस</strong>