काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज (मंगळवार, १२ मार्च) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पदयात्रेचा राज्यातला पहिला थांबा नंदुरबारमध्ये आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दाखल झाल्यावर नंदुरबारच्या सीबी मैदानावर राहुल गांधी यांची मोठी सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी नंदुरबारसह देशभरातील आदिवासींसाठी मोठ्या घोषणा केल्या. राहुल गांधी म्हणाले, देशात आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षाच्या आत आम्ही आदिवासींसाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ.

राहुल गांधी म्हणाले, आदीवासींचे जमीन आणि इतर गोष्टींवरील जे दावे आहेत ते निकाली काढू. तुमची जमीन तुमच्या ताब्यात दिली जाईल. तसेच तुमचे जे दावे फेटाळले होते त्याची फेरतपासणी केली जाईल आणि सहा महिन्यांच्या आत ते निकाली काढले जातील. आम्ही बनवलेला वन संवर्धन कायदा आणि भूसंपादन कायदा या सरकारने कमकुवत केला आहे. आम्ही पुन्हा एकदा या कायद्यांना मजबुती प्रदान करू. काँग्रेस सरकारमध्ये तुमच्या अधिकारांचं संरक्षण केलं जाईल. तुमच्या जमिनींना चौपट किंमत मिळेल अशी तरतूद करू. जल, जंगल आणि जमीन तुमच्याकडेच राहील, याची काळजी घेऊ.

राहुल गांधी म्हणाले, यासह सर्वात ऐतिहासिक निर्णय आम्ही घेणार आहोत. देशातल्या ज्या भागात आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तो भाग आम्ही घटनेच्या सहाव्या परिशिष्टांतर्गत घेऊ. जेणेकरून तिथले सर्व स्थानिक निर्णय आदिवासी लोकच घेतील. इतर लोक त्यात ढवळाढवळ करू शकणार नाहीत. जशी शेतकऱ्यांच्या पिकांच्या हमीभावाबाबाबत आम्ही कायदेशीर गॅरंटी देणार आहोत, त्याचप्रमाणे आम्ही जंगलात उगवणाऱ्या, पिकवल्या जाणाऱ्या पिकांना आणि उत्पादनांना हमीभावाची कायदेशीर गॅरंटी देऊ. यासह तुम्हाला स्वतंत्र अधिकार असतील. गावागावांमध्ये तुमचं स्वायत्त सरकार असेल. आम्ही ते तुमच्यासाठी उभं करू.

हे ही वाचा >> मनोहरलाल खट्टर यांच्याजागी आता नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यंमत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१४ वर्षांनंतर गांधी घराण्यातील सदस्य नंदुरबारमध्ये

ज्या नंदुरबार जिल्ह्यावर गांधी घराण्याचे विशेष प्रेम राहिले आहे, त्या नंदुरबारकडे २०१० नंतर गांधी घराण्याचा एकही सदस्य फिरकला नाही. त्यामुळेच की काय तब्बल १४ वर्षानंतर राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये आल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.