Rahul Gandhi at Annual Legal Conclave 2025 : काँग्रेसने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात कायदेविषयक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवर भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले, “आम्ही कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होतो तेव्हा भाजपाने मला धमकावण्याचा प्रयत्न केला. मला धमकावण्यासाठी त्यांनी अरुण जेटली यांना पाठवलं होतं. त्यानंतर जेटली माझ्याकडे आले आणि यांनी माझ्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता.”
कायदेविषयक परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “मला चांगलंच आठवतंय की मी कृषी कायद्यांविरोधात लढत होतो, तेव्हा अरुण जेटली यांना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. तेव्हा जेटली मला म्हणाले होते की तुम्ही सरकारविरोधात आंदोलन करत राहिलात, कृषी कायद्यांविरोधात लढत राहिलात तर आम्हाला तुमच्याविरोधात कारवाई करावी लागेल.”
राहुल गांधी काय म्हणाले?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणाले, “अरुण जेटली यांचं ते वक्तव्य ऐकून मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना म्हणालो, मला नाही वाटत की तुम्हाला माहितीय की तुम्ही कोणाशी बोलत आहात.”
या परिषदेवेळी उपस्थितांनी ‘देश का राजा कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “मी राजा नाही. मला राजा बनायचंही नाही. मी राजा नावाच्या संकल्पनेच्या विरोधात आहे.”
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह
राहुल गांधी यांनी यावेळी देशातील मतदान प्रक्रियेवर संशय उपस्थित केला. ते म्हणाले, “मला खूप आधीपासून संशय होता की २०१४ पासूनच निवडणूक प्रक्रियेत, मतदानावेळी काहीतरी गडबड होत आहे. मला गुजरातमधील निवडणुकांपासून संशय होता. काँग्रेस मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये एकही जागा जिंकू शकली नव्हती, हा निकाल माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होता. आम्ही खूप आधीपासून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आहोत. मात्र, आम्ही प्रश्न उपस्थित केले की लोक आम्हाला विचारत होते की पुरावे आहेत का? त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे काही झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. लोकसभा निवडणुकीत तिथे आम्ही जिंकलो. मात्र, लोकसभेनंतर चारच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही केवळ पराभूत झालो नाही तर आमचा सुपडा साफ झाला.”