लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवातून काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नसतानाच आता पक्षात पुन्हा एकदा नेतृत्वबदलाची मागणी जोर धरू लागल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा पूर्णवेळ हाती घेण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीची धुरा राहुल गांधी यांनी हाती घ्यावी, असे सर्व काँग्रेसजनांना वाटत आहे, असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच दिग्विजयसिंह यांनी असेच विधान केले होते, मात्र दिग्विजयसिंह यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करून काँग्रेस पक्षाने त्याबाबत कानावर हात ठेवले होते.
दिग्विजयसिंह यांनी वरील मत व्यक्त केले असले तरी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी याच आमच्या नेत्या असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांना संधी मिळाल्यास ते पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळतील याची आपल्याला खात्री आहे, मात्र सोनिया गांधी याच आमच्या नेत्या म्हणून कायम राहतील, असेही ते म्हणाले.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घवघवीत यश मिळविले. एकेकाळी केवळ दोनच राज्यांमध्ये सत्ता होती ती १४ राज्यांमध्ये प्रस्थापित झाली. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये पक्षाने केंद्रात सत्ता स्थापन केली. मात्र आता पक्षाची धुरा राहुल गांधी यांनी स्वीकारण्याची वेळ आली असून सर्व काँग्रेसजन त्याला पाठिंबा देतील, असेही ते म्हणाले.

‘व्यापम’ घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना वाचविणे हाच ‘एसटीएफ’च्या तपासाचा उद्देश
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) घोटाळ्यातून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना सहीसलामत बाहेर काढणे शक्य व्हावे या उद्देशानेच विशेष कृती दलाचा (एसटीएफ) तपास सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. व्यापम घोटाळ्याचा तपास पूर्णत: लाचारपणाचा असून मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ राजकीय नेते आणि मर्जीतील अधिकारी यांना वाचविण्याच्या उद्देशानेच तो केला जात आहे, असे दिग्विजयसिंह म्हणाले. एसटीएफचे अध्यक्ष न्या. चंद्रेश भूषण यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सदर घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका दिग्विजयसिंह यांनी केल्यानंतर एसटीएफची स्थापना करण्यात आली. ज्या पद्धतीने तपास सुरू आहे ते पाहता आरोपींना शिक्षा होणार नाही असे वाटते आणि त्यामुळेच आपण सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्याचा गोपनीय अहवाल मुख्यमंत्री लिहितात तोच अधिकारी मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या आरोपांची चौकशी कशी करणार, असा सवालही दिग्विजयसिंह यांनी केला. या घोटाळ्यासंदर्भात संगणकाची हार्ड डिस्क ताब्यात घेण्यात आली असली तरी काही नेत्यांना वाचविण्यासाठी त्यामध्ये फेरफार करण्यात आले.