देशभरात आज १९७१च्या युद्धातील भारताच्या विजयाचा उत्सव साजरा केला जात आहे. भारतानं या युद्धात पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशला स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिलं, त्या प्रीत्यर्थ आजचा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने देशभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, दिल्लीत अशाच एका कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, या कार्यक्रमात दिवंगत इंदिरा गांधी यांच्या निधनाच्या दिवशी घडलेला प्रसंग सांगताना राहुल गांधी काही क्षण भावुक झाल्याचं दिसून आलं.

“तुमच्या-माझ्यात एक नातं आहे, म्हणूनच…”

“मी तुमचा त्याग समजू शकतो. जे तुम्ही सहन केलंय ते आम्हीही सहन केलंय. मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही, जेव्हा मला शाळेत सांगितलं गेलं की इंदिरा गांधींना ३२ गोळ्या लागल्या आहेत. तसेच उत्तराखंडमध्ये हजारो कुटुंब आहेत, ज्यांच्या घरी फोन आला की बाबा शहीद झाले, काका शहीद झाले. तुमच्या-माझ्यात एक नातं आहे. म्हणून मी खुलेपणानं तुमच्याशी बोलू शकतो”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

दरम्यान, डेहराडूनमध्ये झालेल्या या सभेमध्ये बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, या सरकारला सत्याची भिती वाटत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

“ज्या महिलेनं देशासाठी ३२ गोळ्या झेलल्या…”

डेहराडूनमध्ये काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विजय सन्मान सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी बांगलादेश युद्धाच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमाचं उदाहरण देऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. “आज दिल्लीमध्ये बांगलादेश युद्धासंदर्भात एक कार्यक्रम आयोजित केला होता. पण या कार्यक्रमात इंदिरा गांधींचं कुठेही नाव नव्हतं. ज्या महिलेनं देशासाठी ३२ गोळ्या झेलल्या, तिचं नाव कार्यक्रम पत्रिकेवर, आमंत्रण पत्रिकेवर नव्हतं. कारण या सरकारला सत्याची भिती वाटते”, असं राहुल गांधी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवघ्या १३ दिवसांत भारतानं पाकिस्तानला नमवलं, कारण..

दरम्यान, बांगलादेश युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानी फौजांना अवघ्या ३ दिवसांमध्ये हरवल्याचं राहुल गांधी म्हणाले. “१९७१च्या युद्धात पाकिस्तानला १३ दिवसांत शरणागती पत्करावी लागली. सामान्यपणे युद्ध ६ महिने, वर्षभर लढली जातात. अमेरिकेनं अफगाणिस्तानला पराभूत करण्यासाठी २० वर्ष घेतली. पण भारतानं फक्त १३ दिवसांत पाकिस्तानचा पराभव केला. याचं कारण म्हणजे तेव्हा संपूर्ण भारत एक होऊन उभा होता”, असं राहुल गांधींनी नमूद केलं.