कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. तत्पूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी (२१ मार्च) अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने केजरीवाल यांना अटक केली. गेल्या महिन्यात ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आहे.

केजरीवाल यांना अटक केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यावर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा तीव्र निषेध. भाजपा सत्तेसाठी किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येतंय. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभी आहे.

शरद पवारांपाठोपाठ काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीदेखील या अटकेवरून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राहुल यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, एक घाबरलेला हुकूमशाह मृत लोकशाही बनवण्याच्या प्रयत्नात आहे. माध्यमांसह सर्व संस्था काबीज करणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणं, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणं हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होतं, म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. ईडीने त्यांना तब्बल ९ वेळा समन्स बजावलं होतं. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.

हे ही वाचा >> मोदींकडून काँग्रेसची आर्थिक गळचेपी; प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईबाबत सोनिया गांधी यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर हल्लाबोल

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. खरगे म्हणाले, ‘आम्हीच जिंकू’, अशा अर्थाने रोज विजयाबाबत खोटे दावे करणारी अहंकारी भाजपा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना सर्व प्रकारे आणि बेकायदेशीर मार्गांनी कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना खरंच विजयाबाबत विश्वास असता तर त्यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची बँक खाती सत्तेचा आणि संस्थांचा गैरवापर करून गोठवली नसती.