Rahul Gandhi Speech : भारत आणि पाकिस्तानमध्ये मी शस्त्रविराम घडवून आणला असं डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ वेळा सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींचं उदाहरण देतात, त्यांच्यात इंदिरा गांधींच्या तुलनेत ५० टक्के जरी हिंमत आहे तर संसदेत सांगा डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत असं थेट आव्हानच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.
भारत सरकारने घोडचूक केली आहे-राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले भारत सरकारने घोडचूक केली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत राजनाथ सिंह यांनीच सांगितलं की आम्हाला युद्ध नकोय. सभागृहात सांगितलं मी काहीही खोटं बोलत नाही. डोनाल्ड ट्रम्प २९ वेळा सांगितलं आहे की पाकिस्तान आणि भारत यांच्यात मी शस्त्रविराम घडवून आणला. डोनाल्ड ट्रम्प २९ वेळा हे म्हणतात. हे जर खोटं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत. इंदिरा गांधी यांच्या तुलनेत ५० टक्के जरी हिंमत असेल तर आज नरेंद्र मोदींनी हे मान्य करावं की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत.
सॅम माणेकशॉ यांनी जो वेळ मागितला तो दिला गेला-राहुल गांधी
आज या सभागृहात सॅम माणेकशॉ यांचं उदाहरण दिलं गेलं. त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनी सांगितलं होतं सहा महिन्यांचा वेळ द्या, आपल्याला जी मोहीम राबवायची आहे ती आपण उन्हाळ्यात राबवू. इंदिरा गांधींनी त्यांना पुरेसा वेळ दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवलं ते फक्त त्यांची प्रतिमा सांभाळण्यासाठी असाही आरोप आज राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशातील सुरक्षा दलांचा उपयोग देशाच्या रक्षणासाठी झाला पाहिजे कुणाच्याही प्रतिमा जपण्यासाठी नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सांगायला हवं होतं की जा तुम्हाला खुली सूट आहे. मात्र त्यांनी आपले पायलट असोत किंवा सैन्य दलं त्या सगळ्यांना हात बांधून युद्ध करायला पाठवलं. पाकिस्तानशी युद्ध करण्याची तुमची राजकीय इच्छा शक्तीच नव्हती असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून वक्तव्य केलं ते म्हणाले की भारत देश हा तुमच्या प्रतिमेपेक्षा मोठा आहे, तुमच्या राजकारणापेक्षा मोठा आहे, असंही राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.