Rahul Gandhi to Adopt 22 Children: २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर झालेल्या संघर्षात आपले पालक किंवा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य गमावलेल्या पूंछमधील २२ मुलांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी या मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार आहेत. ही मुले पदवीधर होईपर्यंत ही मदत सुरू राहणार आहे, असे कर्रा यांनी स्पष्ट केले. या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा पहिला हप्ता बुधवारी (३० जुलै) दिला जाणार आहे.
मे महिन्यात पूंछच्या दौर्यादरम्यान राहुल गांधी यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांना बाधित झालेल्या मुलांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माहिती गोळा केली आणि शासकीय नोंदींची सखोल पडताळणी करून पात्र मुलांची अंतिम यादी तयार करण्यात आली.
या दौर्यादरम्यान राहुल गांधी यांनी क्राइस्ट पब्लिक स्कूललाही भेट दिली, जिथे उर्बा फातिमा आणि झैन अली या १२ वर्षांच्या जुळ्या बहीण-भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, “मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला तुमच्या मित्रांची आठवण येते, हे मी समजू शकतो. तुम्ही मित्रांना गमावले त्याबद्दल मला खूप वाईटही वाटते. सध्या थोडा धोका, थोडी भीती वाटत असेल; पण काळजी करू नका, सर्व काही पुन्हा सुरळीत होईल. त्यावर मात करण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे खूप मेहनत करणे आणि शाळेत भरपूर चांगले मित्र बनवणे.”
सीमेपलीकडून सातत्याने होणाऱ्या गोळीबारामुळे पूंछ शहर सर्वाधिक प्रभावित झाले होते. या हिंसाचारात ‘जिया उल आलूम’ या धार्मिक शाळेवर झालेल्या गोळीबारात खूप मुले जखमी झाली होती. या घटनेतील बळींपैकी एक होता विहान भार्गव, ज्याच्या कुटुंबाने सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी शहर सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळीबारात विहानचा दुर्दैवी मृत्यू झाला.