२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ३०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार भाजपाने केला असतानाच ताज्या सर्वेक्षणाने नरेंद्र मोदी व भाजपाच्या गोटात चिंता निर्माण होऊ शकते. आंध्र प्रदेशमधील जनतेने पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पसंती दर्शवली असून कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमध्ये राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना ‘कांटे की टक्कर’ दिली आहे.

इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया या संस्थेने तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील जनतेचे मत जाणून घेतले. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर मात केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४४ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तर नरेंद्र मोदींना ३८ टक्के लोकांनी पाठिंबा दिला. या राज्यात तेलगू देसम पक्षाची पिछेहाट होताना दिसते. ३९ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा दिला. तर ३८ टक्के लोकांनी चंद्राबाबू नायडू यांना पसंती दर्शवली.

कर्नाटकमध्ये काँग्रेस- जनता दल सेक्यूलर आघाडीबाबत जनतेत नाराजी असल्याचे दिसते. ३५ टक्के लोकांनी विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. कर्नाटकमधील सुमारे साडे अकरा हजार लोकांचे मत या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आले. कर्नाटकात ५५ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना तर ४२ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दर्शवली.

तेलंगणात के. चंद्रशेखर राव सरकारच्या कारभारावर ४८ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले. या राज्यात पंतप्रधानपदासाठी ४४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला. तर राहुल गांधींना ३९ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. या राज्यात सर्वेक्षणात ७, ११० लोकांचे मत जाणून घेण्यात आले.