वॉशिंग्टर : भारतीय राजकारणात प्रेम, आदर आणि नम्रता यांचा अभाव आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टेक्सासमधील भारतीय अमेरिकन समुदायाला संबोधित करताना केले. त्यांनी या वेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही जोरदार टीका केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच राहुल गांधी यांनी अमेरिकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते की भारत एक विचार आहे. मात्र आम्ही मानतो की भारत अनेक विचारांचा देश आहे. अमेरिकेप्रमाणेच भारतात प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे, प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे आणि प्रत्येकाला त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा, इतिहास विचारात न घेता संधी दिली पाहिजे,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

‘‘हा लढा आहे. पंतप्रधान मोदी देशाच्या राज्यघटनेवर हल्ला करत असल्याचे लाखो नागरिकांना स्पष्टपणे समजले, तेव्हा या लढ्याने निवडणुकीत रंग भरला. कारण राज्यांचे संघटन तुम्हाला भाषा, धर्म, परंपरा यांचा आदर करायला सांगते आणि हे सर्व राज्यघटनेत आहे, असे गांधी म्हणाले.

हेही वाचा >>> दिल्लीतील संशयित रुग्णाला लागण झाल्याचे स्पष्ट; ‘मंकीपॉक्स’बाबत केंद्राच्या सूचना

भारतात कौशल्य असलेल्यांकडे दुर्लक्ष

भारतात कौशल्याची कमतरता नाही, मात्र भारतात कौशल्य असलेल्या लाखो लोकांना बाजूला केले जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यासाठी त्यांनी महाभारतातील एकलव्याचा उल्लेख केला. त्याच्या गुरूच्या मागणीनुसार त्याला त्याचा अंगठा तोडावा लागला. ‘‘तुम्हाला भारतात काय चालले आहे हे समजून घ्यायचे असेल, तर देशाला लाखो एकलव्यांच्या कथा आहेत. कारण दररोजच कौशल्य असलेल्यांना बाजूला केले जात आहे. त्यांचा विकास होऊ दिला जात नाही, असे राहुल म्हणाले.

राहुल भारतीय लोकशाहीवर कलंक

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपने तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले. राहुल हे भारतीय लोकशाहीतील काळा डाग असल्याची टीका भाजपने केली. काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार परदेशात आपल्या वक्तव्याने भारतीय लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. राहुल गांधी हे अपरिपक्व आणि अर्धवेळ नेते असल्याच्या टीकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला वाटते की आपल्या राजकीय व्यवस्थेत आणि सर्व पक्षांमध्ये प्रेम, आदर आणि नम्रता आहे. मात्र केवळ एका धर्माचे, एका समुदायाचे, एका जातीचे, एका राज्याचे किंवा एकच भाषा बोलणाऱ्या लोकांवर प्रेम न करता सर्व मानवांवर प्रेम केले पाहिजे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा