काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या हाथरस येथे एका संत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. या घटनेनंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी या घटनेतील पीडित कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार; तर दोन जवान शहीद, अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी वीरमरण

राहुल गांधी यांनी एक्स या समाजमाध्यमावर हे पत्र शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. शनिवारी हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहित असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच या घटनेमुळे मनात खूप दुख: आहे, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी या पत्रात पीडित कुटुंबियांसाठी घोषित करण्यात आलेल्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी देखील केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांना जी आर्थिक मदत जाहीर केली आहे, ती तोडगी आहे, त्यामुळे या आर्थिक मदतीत वाढ करावी, अशी मागणी मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना करतो आहे, असं राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच ज्या जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यांनाही योग्य आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईचीदेखील मागणीही केली आहे. मी जेव्हा या घटनेतील पीडित कुटुंबियांना भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितलं, की या दुर्घटनेला स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या कारवाईमुळे यापुढे अशा घटना रोखण्यास मदत होईल, असंही राहुल गांधी पत्रात म्हणाले.

हेही वाचा – हाथरस प्रकरणात मुख्य आरोपीला अटक; देवप्रकाश मधुकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राहुल गांधी शुक्रवारी उत्तर प्रदेशात पोहोचत हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सत्संगाच्या दिवशी नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी कशी झाली? त्याबाबत माहिती घेतली होती. तसेच या कुटंबियांचे सांत्वन करत त्यांना मदतीचं आश्वासन दिलं होतं.