कॉंग्रेस पक्षाचा विरोध करणाऱयांनी देशाचा इतिहास बघितलेला नाही. कॉंग्रेस केवळ एक संघटना नसून, तो एक विचार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देणे, तिच्याशी प्रेमाने वागणे, सगळ्यांनी मिळून काम करणे आणि तळागाळातील व्यक्तीला शक्ती मिळवून देण्याचे काम कॉंग्रेस पक्षाला करायचे आहे. कॉंग्रेसच्या विचारांनीच इंग्रजांना माघारी पाठविले. आता याच विचारांनी भाजपलाही माघारी पाठवायचे आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी औरंगाबादमधील सभेत केले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. सभेमध्ये त्यांनी कॉंग्रेसने केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे राज्यातील मंत्री आणि नेते उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, देशातील आम आदमीला शक्ती मिळवून देण्याची सध्या सर्वाधिक गरज आहे. त्यासाठी ग्राम पंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र सर्वसामान्यांना प्रतिनिधित्व देऊन त्याचे हात बळकट करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. या उलट भाजपच्या नेत्यांना सर्व सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात द्यायची आहे. सर्वसामान्यांचे हात बळकट करण्यासाठी यूपीए सरकारने माहिती अधिकार कायदा, अन्नसुरक्षा कायदा, लोकपाल कायदा आणला. या कायद्यांना भाजपचने विरोध केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारपेक्षा यूपीएच्या काळात तीन पट जास्त रस्ते तयार करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, यूपीए सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात १४ कोटी लोकांना द्रारिद्रयरेषेच्या वर आणले आहे. मनरेगासारख्या योजनांचा देशातील अनेक लोकांना फायदा झाला.
भाजपचे नेते आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. मात्र, कर्नाटकात त्यांच्या मंत्र्याला तुरुंगात जावे लागल्यानंतरी भाजपचे नेते त्यांच्या गळ्यात गळे घालताहेत. भाजपच्या नेतृत्त्वाखालील गुजरात सरकारमध्ये तीन भ्रष्ट मंत्री आहेत, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच काहीजणांनी मराठा आरक्षणाचे फलक झळकावून त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.