Rahul Gandhi in Uttarakhand : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी तळगाळातील नागरिकांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रकचालकांसह संवाद असो वा गॅरेजमधील कर्मचाऱ्यांशी साधलेला संवाद असो, राहुल गांधी विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधत आहेत. आता त्यांनी, उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिरातील भक्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीने लक्ष वेधलं आहे.

राहुल गांधी खासगी हेलिकॉप्टरने रविवारी केदारनाथ मंदिरात पोहोचले. तिथे केदारनाथ मंदिरातील पुजारी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं. रविवारी रात्री राहुल गांधींनी केदारनाथ मंदिरातील भक्तांशी संवाद साधला. तसंच, त्यांना चहाचंही वाटप केलं. भक्तांना चहाचं वाटप केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं कौतुक केलंय. भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून त्यानी उत्तराखंडला भेट दिल्याचं म्हटलं जातंय. यापूर्वी ते अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गेले होते. तेथेही त्यांनी सेवा दिली होती.

केदारनाथला पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ते म्हणतात की, केदारनाथ धामला भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले. भक्तांना चहा वाटपाचं काम करण्याचं सौभाग्य लाभलं.

परंतु, राहुल गांधींच्या केदारनाथ भेटीवर भाजपाने टीका केली आहे. भाजपाचे राज्य माध्यम प्रभारी मनवीर सिंग चौहान म्हणाले की, केदारनाथ भेटीमुळे राहुल गांधींना सद्बुद्धी मिळेल. त्यांचे नेते राष्ट्रहितासाठी भ्रष्टाचारविरोधी धोरण देण्याची शपथ घेतील. राहुल गांधींचे सनातन धर्माविषयीचे प्रेम दिसून येत आहे. परंतु, त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनाच त्यांची श्रद्धेबद्दल शंका येते. राजकीय फायद्यासाठी ते हा दौरा करत आहेत.