काँग्रेसला राहुल गांधी यांच्यात भावी पंतप्रधान दिसत असला तरी घराणेशाही ही राहुल यांची एकमेव जमेची बाजू आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे नेते व्यंकय्या नायडू यांनी रविवारी येथे केली. नायडू यांनी या वेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही टीकेचे लक्ष्य केले.
नायडू म्हणाले की, नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांची वारेमाप स्तुती केली आहे. राहुल यांच्यात उपजत नेतृत्वगुण आहेत, त्यांच्यात अन्य अनेक गुणही आहेत, देशाचे भावी पंतप्रधान राहुलच असतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे, मात्र मी त्यांना विचारू इच्छितो की घराणेशाही वगळता राहुल यांच्यात नेमके कोणते गुण आहेत, हे पंतप्रधानांनी सांगितले असते तर बरे झाले असते. या निवडणुकीनंतर आपण निवृत्त होणार, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे, मात्र तसे बोलायची काहीच आवश्यकता नव्हती. या निवडणुकीनंतर देशभरातील मतदार काँग्रेसलाच निवृत्त करणार आहेत आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधानांनी मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचाही नायडू यांनी समाचार घेतला. मोदी पंतप्रधान झाल्यास देशासाठी ते घातक ठरेल, असे मनमोहन सिंग म्हणत आहेत, प्रत्यक्षात मोदी हे काँग्रेससाठी घातक ठरणार आहेत. मोदी यांच्यात अफाट निर्णयक्षमता आहे, त्यांच्या विकासाभिमुख राजकारणामुळे देशभरातील जनता त्यांच्याकडे आकृष्ट झाली आहे, दुसरीकडे, मनमोहन सिंग यांची ओळख दुबळे पंतप्रधान अशीच होईल, सर्वाधिक भ्रष्ट सरकारचे ते नेते आहेत, त्यांच्या कार्यकाळात महागाईने कळस गाठलाय, विकासाचा दर खालावला आहे, परकीय गंगाजळी आटली आहे, आपले परराष्ट्र धोरण मार खात आहे, एकूणच, सिंग यांनी आपल्या देशाला अनेक वर्षे मागे ढकलले आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘आप’ची चिंता नाही
आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी संपूर्ण शक्ती पणाला लावणार असली तरी आम्ही त्याची चिंता करत नाही. प्रत्येक पक्षाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, मात्र दिल्लीतील मर्यादित राजकारण आणि देशभरातील राजकारण यात फरक आहे. देशभरात त्यांचा प्रभाव पडणे कठीण आहे. आमचा पक्ष गेली अनेक वर्षे समाजकारणात व राजकारणात आहे, आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, अशा परिस्थितीत आम्ही त्यांची चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही, असे नायडू म्हणाले.