मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीत ही भेट झाली. या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा रंगली होती. या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र राज ठाकरे हे महायुतीत आले तर ती त्यांच्यासाठी नवी सुरुवात असणार आहे यात काही शंकाच नाही.

शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंचा करीश्मा राज्याने पाहिला

राज ठाकरेंनी शिवसेनेला ९ मार्च २००६ ला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसैनिकही जातील आणि शिवसेनेची दोन शकलं होतील अशी चर्चा रंगली होती. मात्र तसं काहीही झालं नाही. बाळासाहेब ठाकरेंकडून म्हणजेच आपल्या काकांकडून राज ठाकरेंना राजकारणाचं बाळकडू त्यांच्या घरातच मिळालं. व्यंगचित्रकला आणि राजकारण या दोहोंबाबत राज ठाकरेंचे गुरु बाळासाहेबच होते. राज ठाकरेंनी जेव्हा स्वतःचा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी मराठीचा मुद्दा खूप चाणाक्ष पद्धतीने शिवसेनेकडून हिरावून घेतला.

राज ठाकरेंची कारकीर्द वादळी

राज ठाकरे यांची संपूर्ण कारकीर्द ही वादळी म्हणावी अशीच राहिली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी करीश्मा काय असतो ते दाखवून दिलं होतं. कारण मनसेचे १३ आमदार त्या निवडणुकीत जिंकून आले होते. मराठीचा मुद्दा, मराठी पाट्या, पोलिसांसाठी केलेलं आंदोलन यामुळे राज ठाकरे हे कायमच चर्चेत राहिले. २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी थेट मोदींना पाठिंबा दिला. तर २०१९ मध्ये ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह गेले. राज ठाकरेंना २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये खूप भरघोस यश मिळालं नाही. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा एक-एकच आमदार निवडून आला. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाण्याची भूमिका घेतली होती तेव्हा त्यांच्या सभा आणि ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे त्यांचं वक्तव्य यांची बरीच चर्चा झाली होती. मात्र राज्यावर करोनाचं संकट आल्यानंतर दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये गेली. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, उद्धव ठाकरे म्हणजेच राज ठाकरेंचे बंधू मुख्यमंत्री झाले. पण उद्धव ठाकरेंची धोरणं राज ठाकरेंना पटली नाहीत हे त्यांच्या कृतींमधून, पत्रांमधून, वक्तव्यांतून दिसून आलं.

हे पण वाचा- “राज ठाकरेंनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला तर..”, अतुल भातखळकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य

लॉकडाऊननंतर राज ठाकरेंची भूमिका बदलली

लॉकडाऊननंतर म्हणजेच २०२१ च्या मध्यात त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलला. तसंच मशिदींच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसा लावण्याची भूमिका घेतली. या सगळ्या दरम्यान राज ठाकरे यांची एक शस्त्रक्रियाही २०२२ मध्ये पार पडली. तसंच त्यांच्या अयोध्या दौऱ्याचीही चर्चा रंगली होती. मात्र तो दौरा झाला नाही. मनसेला २०१४ ते २०२१ या कालावधीत उतरती कळा लागली होती. आता राज ठाकरे हे पुन्हा एकदा पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांच्या सभा, त्यांची बदललेली भूमिका, उत्तर भारतीयांविषयी द्वेष काहीसा कमी होणं या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंशी जवळीक

महाराष्ट्रात जेव्हा शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं त्यानंतर म्हणजेच जून २०२२ नंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे यांच्यातली जवळीक वाढलेली पाहण्यास मिळाली. या तिघांनी २०२२ ला दिवाळी महोत्सवातही एकत्र उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतरही ते एकमेकांना अनेकदा भेटले. उद्धव ठाकरेंसह असताना आम्ही राज ठाकरेंना भेटू शकत नव्हतो हे तर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं. या भेटीगाठी वाढल्यापासूनच राज ठाकरे महायुतीत येतील का? या चर्चा रंगल्या होत्या. असं घडलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करु असं वारंवार भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच ते आज म्हणजेच राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या दिवशीही सांगण्यात येतं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याने काय साधेल?

राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार त्यांना बोलवलं आहे म्हणून ते दिल्लीत गेले आहेत. आता अमित शाह यांनी जर त्यांना बोलवलं असेल तर ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच महत्त्वाची मानली पाहिजे. कारण राज ठाकरे हे जर महायुतीत सहभागी झाले तर ‘ठाकरे ब्रांड’ पुन्हा एकदा महायुतीबरोबर येईल. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेले आहेत. त्यामुळे महायुतीत मोकळी झालेली ठाकरेंची स्पेस भरुन काढण्यात राज ठाकरे यशस्वी होऊ शकतात. कारण राज ठाकरेंकडे लोकांना आपलंसं करण्याचा, आपलं म्हणणं भाषणांतून मांडण्याचा करीश्मा आहे. अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यातली ही भेट या नव्या बदलांचं द्योतक आहे यात काहीही शंका नाही. राज ठाकरे हे जर महायुतीत आहे तर निश्चितच ती त्यांच्यासाठी आणि एका अर्थाने भाजपासाठीही नव्या पर्वाची सुरुवात ठरेल.