मागील काही दिवसांपासून देशातील केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घलण्यात येत असल्याची घोषणा केली. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ‘पीएफआय’वरील बंदीबाबत निवेदन प्रसृत केले. या कारवाईचे भाजपा आणि मित्र पक्षांकडून स्वागत करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या पुण्यातील घोषणाबाजीवरुन या संघटनेला चांगली अद्दल घडवावी असं पत्र केंद्रीय आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं.

राज यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणाबाजीनंतर लिहिलेल्या पोस्टमध्येही अमित शाहांना टॅग केलं होतं. “दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे या गंभीर आरोपांखाली या संघटनेच्या लोकांना अटक झाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी अटकसत्र घडलं. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थक करत पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत,” असा इशारा राज यांनी या पोस्टमधून दिला होता. या पोस्टच्या काही दिवसांनंतरच केंद्रीय गृहमंत्रालयाने संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने राज यांनी ट्वीटरवरुन सामाधान व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”

केंद्रीय गृहमंत्री शाह यांना टॅग करुन राज यांनी एक ट्वीट केलं आहे. “पीआयएफ या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली. याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेव्हा जेव्हा तयार होईल तेव्हा तेव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन,” असं राज यांनी म्हटलं आहे.

राज यांनी मराठीबरोबरच इंग्रजीमध्येही ट्वीट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी ‘पीएफआय’सह तिच्याशी संबंधित ८ संघटनांवरही बंदी घालण्यात आल्याचे गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. ‘‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या बंदी घातलेल्या संघटनांचे सदस्य ‘पीएफआय’चे संस्थापक असून आयसिससारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी ‘पीएफआय’चे धागेदोरे आढळून आले आहेत. एका समाजाच्या धार्मिक भावना भडकवून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील केले जात होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘पीएफआय’ आणि अन्य संघटनांवर बंदी घालण्यात येत आहे,’’ असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.