राजस्थानमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राजस्थानमध्ये, अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात फेरबदलाचा एक भाग म्हणून १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये ११ कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री असतील. रविवारी दुपारी चार वाजता राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) मिळालेल्या माहितीनुसार, हेमाराम चौधरी, महेंद्रजित मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली जाईल. त्याचवेळी आमदार जाहिदा खान, ब्रिजेंद्र ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीना हे राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

याआधी राजस्थान सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती काँग्रेसचे नेते प्रताप सिंह खचरियावास यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. तत्पूर्वी शुक्रवारी गोविंद सिंह दोतास्रा, हरीष चौधरी आणि रघु शर्मा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामे पाठविले होते. त्यानंतर शनिवारी गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राजस्थानचे प्रभारी अजय माकन आणि प्रदेशाध्यक्ष दोतास्रा यांनी किसान विजय सभेला संबोधित केले. त्यानंतर माकन आणि गेहलोत यांची एका हॉटेलमध्ये चर्चा झाली.

या यादीत सचिन पायलट यांचे समर्थक हेमाराम चौधरी, रमेश मीना, मुरारीलाल मीना आणि ब्रिजेंद्र ओला यांची नावे आहेत. त्याचवेळी, बहुजन समाज पक्षातून (बसप) काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांपैकी राजेंद्र गुढा यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाविरोधात बंडखोर भूमिका घेतल्याने त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते. यापैकी विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांच्या नावाचा शपथविधी होणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल मिश्रा यांनी तत्काळ प्रभावाने राजीनामा स्वीकारला. संघटनेत काम करण्याच्या उद्देशाने या तिन्ही मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आधीच राजीनामे पाठवले होते. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जादू कायम राहणार की सचिन पायलट अबाधित राहणार, हे आजच्या मंत्रिमंडळ रचनेवरून स्पष्ट होणार आहे. राज्यातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी पक्ष हायकमांडकडे राजीनामे सादर केले आहेत.

राजस्थानमध्ये २०२३ मध्ये निवडणुका होणार असल्या तरी, गेहलोत आणि पायलट गटात सुरू असलेली भांडणे ज्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहेत, ते पाहता गांधी घराणे जास्त सक्रिय झाले आहे. कारण काँग्रेसला ना पंजाबमधील परिस्थितीची पुनरावृत्ती करायची आहे किंवा ज्योतिरादित्य शिंदेनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांना मध्य प्रदेशसारखी सत्ता गमावायची आहे. त्यामुळेच पक्षाचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनी शुक्रवारीच जयपूरमध्ये तळ ठोकला. त्यांनी दोन्ही गटातील मंत्री आणि आमदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेल्या प्रियांका गांधी यांना ते याबाबत संपूर्ण माहिती देत ​​होते.