काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे. यातील चार राज्यांमध्ये भाजपनं विजय संपादन केला आहे. तर पंजाबमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पाच राज्यात झालेल्या पराजयामुळे काँग्रेसच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर चिंतन शिबिराचं आयोजन करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या कार्यकारणीपुढे ठेवला आहे.

पुढील महिन्यात ‘द लेक सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानातील उदयपूर याठिकाणी हे ‘चिंतन शिबिर’ पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थान काँग्रेसकडून शहरात कार्यक्रमाचं ठिकाण शोधण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती देताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितलं की, राजस्थानमध्ये चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात यावं, याबाबतचा प्रस्ताव पक्षाच्या कार्यकारणीपुढे ठेवण्यात आला आहे.

पक्षाच्या चिंतन शिबिराचं आयोजन नेमकं कुठे करायचं? यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांनी स्वत: उदयपूरमधील काही ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. पण कार्यक्रमाचं ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलं नाही. पण उदयपूरमधील कोणत्या ठिकाणी या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात येऊ शकतं, याबाबत चाचपणी केली जात आहे. त्यासाठी प्रस्तावित ठिकाणांची यादी केंद्रीय युनिटला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरचं कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ‘द लेक सिटी’ अशी ओळख असणाऱ्या उदयपुरमध्ये पुढील महिन्यात काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर होण्याची शक्यता आहे.