Rajasthan Crime : देशातील अनेक शहरांत दररोज गुन्हेगारीच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. संपत्तीचा वाद किंवा घरगुती हिंसाचार किंवा कधी किरकोळ वादातून खून किंवा प्रेमसंबंधातून खून झाल्याच्या घटना समोर येतात. आताही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना राजस्थानातील बारमेरमध्ये घडली आहे. एका महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी ६०० किमी गाडी चालवत प्रवास केला. मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने लग्नासाठी गळ घातल्यानंतर प्रियकराने महिलेची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

माहितीनुसार, राजस्थानातील बारमेरमध्ये फेसबुकवर सुरू झालेल्या प्रेमाचा शेवट भयानक झाला. अंगणवाडी पर्यवेक्षक असलेली एक महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी तब्बल ६०० किलोमीटर गाडी चालवून बाडमेरला गेली. मात्र, तेथे गेल्यानंतर तिला प्रेमाऐवजी मृत्यू मिळाला. तिने लग्नाची गळ घातल्याने प्रियकराने लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह गाडीत सोडून अपघात झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

फेसबुकवर झाली होती मैत्री

२०२४ मध्ये शिक्षक मनारामची फेसबुकवर कुमारीशी मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर ते अनेकदा भेटले. ती महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बाडमेरला येत असायची. मात्र, प्रियकर हा विवाहित असून त्याचा घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला होता. पण याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद होत असायचा. १० सप्टेंबर रोजी ती तिच्या कारने बारमेरला पोहोचली आणि तिच्या प्रियकराच्या कुटुंबाला भेटण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ती प्रियकराची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यातही गेली. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांनी दोघांना बोलावून समुपदेशन केलं.

दरम्यान, त्यानंतर दोघेही बारमेरला परतले. मात्र, बाडमेरमध्ये आल्यानंतर प्रियकराने तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने कारच्या ड्रायव्हिंग सीटवर तिचा मृतदेह ठेवून तो अपघात झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.