मुलीवर बलात्कार; अटकेच्या भीतीपोटी नराधम बापाची आत्महत्या

राजस्थानमधील धारियावाडमधील सिहाद गावात राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याने अटकेच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला होता आणि यानंतर महिलेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम पित्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.

राजस्थानमधील धारियावाडमधील सिहाद गावात राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. नराधम पित्याने मद्यधूंद अवस्थेत असताना हे कृत्य केले होते. त्याने पीडित मुलीला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याने मुलीला चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देखील दिली. पीडितेने घरी परतल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला.

महिलेने पतीला याचा जाब विचारताच त्याने पत्नीलाही धमकी दिली. त्याने पत्नीला आणि मुलीला घरात डांबून ठेवले. अखेर महिलेने संधी मिळताच घरातून पळ काढला आणि भावाचे घर गाठले. भावाच्या मदतीने तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे नराधमाला समजले होते. त्याने घरातून पळ काढला होता. सोमवारी सकाळी तो घरी परतला. भावाने त्याला घरी परतताना पाहिले होते. त्याने तातडीने पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचली असता नराधमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajasthan guilty father commits suicide after raping 14 year old daughter

ताज्या बातम्या