राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांकडे अधिवेशन घेतलं जावं अशी मागणी केली आहे. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे असा दावा यावेळी त्यांनी केला. सोबतच देशात याआधी असा ‘नंगा नाच’ कधी पाहिलेला नाही सांगत सीबीआय आणि ईडीच्या छाप्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यपालांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती करताना उद्या जनतेने राजभवनला घेराव घातला तर जबाबदारी आमची नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

“करोना तसंच राज्यातील राजकीय परिस्थितीसंबंधी चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलावलं जावं अशी आमची मागणी आहे. आम्हाला वाटतं काही दबाव असल्याने राज्यपाल अधिवेशन बोलावण्यासंबंधी कोणताही आदेश देत नाही आहेत,” असा दावा अशोक गेहलोत यांनी केला आहे.

आणखी वाचा- “…तर मी पायलट यांचे स्वागत करेन”; अशोक गहलोत यांची ‘ऑफर’

“सोमवारी अधिवेशन सुरु व्हावं अशी आमची मागणी आहे. त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. माझी राज्यपालांशी फोनवरुन चर्चा झाली असून लवकरात लवकर निर्णय घ्या अशी विनंती केली आहे. आता आम्ही त्यांची भेटही घेणार आहोत,” असं अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “भाजपानं संविधानाची सर्कस केली, तर लोकशाहीला द्रौपदी”; काँग्रेसला संताप अनावर

“आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे असं वारंवार सांगत आहोत. चिंता आम्हाला असली पाहिजे, पण तेच चिंतेत आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना बंधक ठेवण्यात आलं आहे. त्यांनाही कदाचित तेथून सुटका करुन घ्यायची असेल. तिथे पोलीस, बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. फोन काढून घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारला याची काळजी नाही का ? हे सगळं भाजपाचं षडयंत्र आहे,” असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.

आणखी वाचा- राजस्थान सत्ता संघर्ष; सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यघटना धोक्यात असून, ईडी, सीबीआयचे छापे सुरु आहेत. असा ‘नंगा नाच’ देशात याआधी कधी पाहिलेला नाही. आम्ही राज्यपालांची भेट घेऊन कोणत्याही दबावात न येता निर्णय घेण्यास सांगणार आहोत. अन्यथा उद्या राज्यातील जनतेने राजभवनला घेराव घातला तर आमची जबाबदारी नाही,” असा इशाराच अशोक गेहलोत यांनी दिला आहे.