Rajasthan Road Accident Jaipur: राजस्थानची राजधानी जयपूरमधील हरमारा भागात आज झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान १९ जणांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोनी यांनी सांगितले की, एका अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
लोहामंडी रोडवर वेगाने येणाऱ्या ट्रकने नियंत्रण गमावले आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार आणि मोटारसायकलींसह अनेक वाहनांना धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रकच्या चालकाने मद्यपान केले होते. तो अनेक वाहनांना धडक दिल्यानंतरही गाडी चालवत राहिला, ज्यामुळे त्याच्या मार्गातील सर्व वाहने चिरडली गेली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्याने मद्यपान केले होते की नाही, हे तपासण्यासाठी वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.
हेड कॉन्स्टेबल रवींद्र यांनी सांगितले की, “हा ट्रक अपघातावेळी रिकामा होता आणि लोहामंडी रोडच्या दिशेने वेगाने जात होता. त्याने प्रथम एका कारला धडक दिली, नंतर दुचाकी आणि ऑटो रिक्षांसह अनेक वाहनांना चिरडले. त्यातील काही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर वाहनांचे सांगाडे, मृतदेह आणि पीडितांचे अवयव सर्वत्र पसरलेले दिसत होते.”
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांनी वाहनांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावल्या. जखमींना कानवटिया रुग्णालय आणि एसएमएस ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
२४ तासांत दुसरा मोठा अपघात
हा अपघात राजस्थानमध्ये गेल्या २४ तासांत झालेला दुसरा मोठा रस्ता अपघात आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा फलोदी जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १० महिला आणि चार मुलांसह किमान १५ जणांचा मृत्यू झाला होता.
कालच्या अपघाताबाबत बोलताना जोधपूरचे पोलीस आयुक्त ओम प्रकाश यांनी सांगितले की, “भारतमाला महामार्गावर जोधपूर जिल्ह्यातील बापिनी उपविभागातील माटोडा गावाजवळ हा अपघात झाला. यामध्ये प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.”
