India-China Relationship: चीनच्या क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली. एक्सवरील एका पोस्टमध्ये राजनाथ सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांनी संबंधांमध्ये सकारात्मक गती कायम ठेवण्याची आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन गुंतागुंत निर्माण करणे टाळण्याच्या गरजेवर भर दिला.

एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “क्विंगदाओ येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीदरम्यान चीनचे संरक्षण मंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी चर्चा झाली. द्विपक्षीय संबंधांशी संबंधित मुद्द्यांवर आमची रचनात्मक आणि भविष्यकाळातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.”

या पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले की, “जवळजवळ सहा वर्षांच्या अंतरानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दल मी आनंद व्यक्त केला. ही सकारात्मक गती कायम ठेवणे आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन गुंतागुंत निर्माण करणे टाळणे हे दोन्ही देशांचे कर्तव्य आहे.”

दरम्यान, या भेटीबाबत चीननेही एक निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “भारत चीनशी संघर्ष करू इच्छित नाही, संवाद आणि परस्पर विश्वास वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. गुरुवारी भारताने एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, कारण दहशतवादाबाबतची त्यांची चिंता हे यामागील एक प्रमुख कारण होते.”

दरम्यान, चीनमधील क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता.

वृत्तानुसार, या निवेदनात पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख टाळण्यात आला होता, परंतु बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा थेट उल्लेख होता. पाकिस्तानने वारंवार भारतावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे, जो आरोप भारताने पूर्णपणे नाकारला आहे.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधात कडक संदेश देत पाकिस्तानवर जोरदार टीकाही केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, “काही देश सीमेपलीकडील दहशतवादाचा वापर धोरणात्मक साधन म्हणून करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुटप्पी निकषांना स्थान नसावे. अशा देशांवर टीका करण्यास शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनने मागेपुढे पाहू नये.”