Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २ २ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं. या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तान आहे हे समजल्यानंतर भारताने ६ आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. याबाबत लोकसभेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली.

पहलगामचा हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा-राजनाथ सिंह

मी आज त्या सगळ्या वीरांना नमन करतो की देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी सर्वस्व पणाला लावलं. देशातल्या सगळ्या दलातील सैनिकांच्या साहसाचं कौतुक करतो. ६ आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर या कारवाई केली. ही फक्त कारवाई नव्हती तर दहशतवादाविरोधात आपण उचललेलं हे कठोर पाऊल होतं. २२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. धर्म विचारुन २६ लोकांना ठार करण्यात आलं. माणुसकीला काळीमा फासणारंच हे उदाहरण ठरलं. या हल्ल्यानंतर पंतपध्रान नरेंद्र मोदींनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसह बैठक केली. ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या आधी सैन्य दलांच्या प्रमुखांनी भरपूर बारकावे तपासले. दहशतवाद्यांचा बिमोड आणि सामान्य नागरिकांचं नुकसान न करणारा पर्याय आपण या कारवाईसाठी निवडला असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवरुन लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. त्यात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आणि पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा-राजनाथ सिंह

पुढे राजनाथ सिंह म्हणाले, आपण जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यात १०० हून अधिक दहशतवादी, त्यांचे ट्रेनर, हँडलर सगळे मारले गेले. लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी कारवाईत ठार करण्यात आले. या दोन संघटनांना पाकिस्तानची सेना आणि आयएसआयचा पाठिंबा आहे. ऑपरेशन सिंदूर रात्रीच्या वेळी राबवण्यात आळं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी असलेल्या नऊ तळांवर भारताने अचूक हल्ला केला. गुलपूर कॅम्प, बर्नाला कॅम्प, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बहावलपूर, मेहमुनाजोया या ठिकाणी आपण हल्ले केले. या ठिकाणचे तळ उद्ध्वस्त केले. २२ मिनिटं ही कारवाई केली आणि आपण दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण ज्या भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्याचं चोख उत्तर आपण पाकिस्तानला दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचा एकही हल्ला आपण यशस्वी होऊ दिला नाही-राजनाथ सिंह

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिम, काऊंटर ड्रोन सिस्टिम, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारताने अयशस्वी करून टाकलं. पाकिस्तान त्यांनी ठरवलेल्या कोणत्याही टार्गेवर हल्ला करू शकला नाही. पाकिस्तानच्या या हल्ल्यांत भारताच्या कोणत्याही मौल्यवान आणि महत्त्वाच्या मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, अशी मोठी माहितीही राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच, पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला रोखण्यात आलं, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळिकीला आपण करारा जवाब दिला. भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुदल या तिन्ही दलांनी महत्त्वाची कामगिरी करत पाकिस्तानला उत्तर दिलं. भारत दहशतावादाविरोधात गप्प बसणार नाही हे आपण पाकिस्तानला आपल्या या कारवाईतून दाखवून दिलं असंही राजनाथ सिंह म्हणाले.